For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ईडीकडून छाप्याचे प्लॅनिंग : राहुल गांधी

06:29 AM Aug 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
ईडीकडून छाप्याचे प्लॅनिंग   राहुल गांधी
Advertisement

लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याचा मोठा दावा : अधिकाऱ्यांना चहा-बिस्कीट माझ्याकडून

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी मोठा दावा केला आहे. लोकसभेतील ‘चक्रव्यूह’ भाषणानंतर ईडीकडून माझ्या विरोधात छापे टाकण्याची तयारी केली जात आहे. मी मोकळेपणाने ईडीच्या अधिकाऱ्यांची प्रतीक्षा करत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Advertisement

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर राहुल गांधी यांनी यासंबंधी पोस्ट केली आहे. 2 जणांपैकी एकला माझे चक्रव्यूहयुक्त भाषण पचनी पडलेले नाही हे स्पष्ट आहे. ईडीच्या अंतर्गत सूत्रांनी छापेमारीची तयारी केली जात असल्याचे मला सांगितले आहे. मी अत्यंत खुल्या मनाने ईडीची प्रतीक्षा करत असून अधिकाऱ्यांना चहा आणि बिस्कीट माझ्याकडून मिळतील असे म्हणत राहुल गांधी यांनी स्वत:च्या पोस्टमध्ये ईडीच्या अधिकृत एक्स हँडललाही टॅग केले आहे.

तर राहुल गांधी यांच्या या दाव्यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी ईडीच्या अधिकाऱ्याचे नाव सांगावे असे आव्हान दिले. तसेच त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याकडून करण्यात आलेले विधान लाजिरवाणे असल्याची टिप्पणी केली आहे.

चक्रव्यूह युक्त भाषण

लोकसभेत राहुल गांधी यांनी सोमवारी केंद्र सरकारवर देशाला अभिमन्यूप्रमाणे चक्रव्यूहात अडकविण्याचा आरोप केला होता. विरोधी पक्षांची आघाडी हा चक्रव्यूह तोडणार असल्याचा दावाही त्यांनी केला होता. सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात निवडक भांडवलदारांचा एकाधिकार आणि लोकशाही संरचना नष्ट करणाऱ्या राजकीय एकाधिकाराला मजबुती प्रदान करण्यात आली आहे. तर युवा, शेतकरी तसेच मध्यमवर्गाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा दावा राहुल गांधी यांनी लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेत म्हटले होते.

21 व्या शतकात आणखी एक चक्रव्यूह तयार करण्यात आला आहे. जे अभिमन्यूसोबत घडले तसेच भारतासोबत केले जात आहे. इंडिया आघाडी सत्तेवर आल्यास जातनिहाय जनगणना करविणार आणि शेतकऱ्यांना किमान हमीभावाची कायदेशीर गॅरंटी देखील देणार आहे. हजारो वर्षांपूर्वी कुरुक्षेत्रात अभिमन्यूला चक्रव्यूहात अडकवून 6 जणांनी फसवून मारले होते, चक्रव्यूहाचे दुसरे नाव ‘पद्मव्यूह’ आहे, जे कमळाच्या फुलाच्या आकारासारखे असते. आज देखील चक्रव्यूहाच्या केंद्रस्थानी 6 जण आहेत. हे 6 जण भारताला नियंत्रित करतात. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, सरसंघचालक मोहन भागवत, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, उद्योजक मुकेश अंबानी आणि अदानी यांचा सहभाग आहे, असे राहुल गांधी भाजपवर निशाणा साधत म्हटले होते.

भाजपकडून टीकास्त्र

काही लोक अॅक्सिडेंटल हिंदू आहेत आणि त्यांचे महाभारतासंबंधीचे ज्ञानही अॅक्सिडेंटल आहे. विरोधी पक्षनेत्याचा अर्थ लीडर ऑफ प्रोपेगैंडा नसतो, राहुल गांधी यांनी रीलचा नेता होऊ नये. रीयल नेता होण्यासाठी सत्य बोलावे लागते हे त्यांनी समजून घ्यावे. जनतेने आम्हाला सलग तिसऱ्यांदा सत्ता सोपविली आहे. कमळ हे भाजपचे निवडणूक चिन्ह आहे.  राहुल गांधी हे कमळाचा अपमान करत नसून भगवान शिव, गौतम बुद्ध यांचा अपमान करत आहेत अशी टीका भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी केली होती. तर लोकसभेतील ठाकूर यांच्या भाषणाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच कौतुक केले होते.

Advertisement
Tags :

.