राज कुंद्रा यांच्या मालमत्तांवर धाड
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अश्लील व्हिडीओ प्रकरणी वादग्रस्त ठरलेले उद्योजक राज कुंद्रा यांच्या महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील अनेक मालमत्तांवर प्रवर्तन निदेशालयाने धाड टाकली आहे. राज कुंद्रा हे हिंदी चित्रपटातील अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती आहेत. त्यांच्यावर अश्लील व्हिडीओ तयार करून त्यांचे मोबाईल अॅपद्वारे प्रसारण केल्याचा आरोप आहे. त्याच प्रकरणात ईडीने या धाडी टाकल्याची माहिती देण्यात आली.
महाराष्ट्रातील मुंबई आणि उत्तर प्रदेशात कुंद्रा यांच्या अनेक मालमत्ता असून त्यांच्यापैकी 15 मालमत्तांवर शुक्रवारी धाडी घालण्यात आल्या. जवळपास दिवसभर हे धाडसत्र सुरू होते. या धाडींमधून काय हाती लागले, यासंबंधी माहिती देण्यात आलेली नाही. तथापि, मालमत्तांविषयक आणि संपत्ती विषयक अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे.
बिटकॉईन प्रकरणातही अभियोग
राज कुंद्रा हे बिटकॉईन फसवेगिरी प्रकरणातही अडकले आहेत. या प्रकरणात यापूर्वी ईडीने त्यांच्या अनेक मालमत्तांवर टाच आणली आहे. त्यांचा मुंबईतील जुहू येथील एक फ्लॅट, पुण्यातील एक फ्लॅट आणि 98 कोटी रुपयांचे समभाग अशा मालमत्तेवर ईडीने टाच आणली आहे. मात्र राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी त्यांच्यावरील आरोप नाकारले असून बेहिशेबी मालमत्ता न जमविल्याचा त्यांचा दावा आहे. या प्रकरणी प्रथम 2018 मध्ये ईडीने कार्यवाहीचा प्रारंभ केला होता.
मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा
ईडीच्या कारवाईला कुंद्रा यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाने ईडीवर काही निर्बंध घालून कुंद्रा यांना काहीसा दिलासा दिला होता. टाच आणलेल्या मालमत्तांमधून कुंद्रा दांपत्याला बाहेर काढण्यास स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे टाच आणली गेलेल्या मालमत्ता अद्यापही कुंद्रा यांच्याच ताब्यात आहेत. यावेळी ईडीने आणखी मालमत्तांवर धाडी टाकल्या आहेत.