शिरवळमध्ये अवैध गुटखा उद्योगावर छापा
शिरवळ :
आशियाई महामार्गाजवळ एका सोसायटीमध्ये गुटखा उत्पादन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मशीन्स, अवैध गुटखा साठ्यावर शिरवळ पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत 1 कोटी 6 लाख 19 हजार 270 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून शिरवळ पोलिसांच्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
शिरवळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टार सिटी अपार्टमेंटमधील दोन गाळ्यामध्ये अवैध गुटखा उत्पादन व साठा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर धडक कारवाई करण्यात आली. दरम्यान, यामध्ये गुटखा उत्पादनासाठी वापरल्या जाण्राया यंत्रसामग्रीची किंमत 83 लाख 19 हजार 270 रुपये आहे, तर अवैध गुटखा, सुपारी व पॅकिंग साहित्याची किंमत 18 लाख 50 हजार रुपये आहे. या कारवाईत एक चार चाकी वाहनही जप्त करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात गुटखा विक्री बंदी असताना देखील गुटखा निर्मिती व साठवणूक मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे या कारवाईने स्पष्ट झाले आहे. या कारवाईत आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. अवैध धंद्याच्या मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शिद, पोलिस अमलदार सूरज चव्हाण, सचिन विर, धरमसिंग पावरा, दीपक पालेपवाड, तुषार अभंग, अरविंद बाराळे, भाऊसाहेब दिघे, अजित बोराटे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त तुषार शिंगाडे, अन्न सुरक्षा अधिकारी वंदना रुपनवर, इमरान हवालदार, प्रियंका वायकर यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला.