वाहनांत अवैध गॅस भरणाऱ्या अड्ड्यावर छापा
कराड :
बनवडी (ता. कराड) येथील बनवडी फाटा येथे शिवशाही हॉटेल पाठीमागे बेकायदेशीरपणे वाहनांत गॅस भरणाऱ्या पॉईंटवर पुरवठा शाखेच्या वतीने छापा टाकण्यात आला. या कारवाईत एकुण 25 सिलिंडर तसेच तीन मशिन असा सुमारे 98 हजार 375 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बनवडी गावच्या हद्दीत बनवडी फाटा येथे शिवशाही हॉटेलच्या पाठीमागील बाजूस बंद खोलीत बेकायदेशीरपणे रिक्षा वाहनांमध्ये गॅस भरण्याचे काम सुरू होते. याबाबत पुरवठा निरीक्षक साहिला नायकवडी व पुरवठा निरीक्षक सागर ठोंबरे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास बेकायदेशीर गॅस पॉईंटवर छापा टाकत धडक कारवाई केली. कारवाईवेळी जागा मालक युवराज माळी यांच्याशी नायकवडी व ठोंबरे यांनी संपर्क साधला. मात्र जागा मालकांने सिलिंडर ठेवलेल्या बंद खोलीच्या कुलपाची चावी नसल्याचे सांगितले. त्यामुळे पुरवठा विभागाने पोलीस बंदोबस्तात बंद खोलीचे कुलूप तोडून खोलीत प्रवेश केला. यावेळी तिथे एकूण 25 गॅस सिलिंडर आढळून आले. त्यामध्ये 19 भरलेल्या तर सहा मोकळया गॅस टाक्या व तीन मशिनचा समावेश होता. पुरवठा विभागाने पंचनामा करून गॅसच्या टाक्या व मशिन जप्त केल्या आहेत
पुरवठा विभागाच्या वतीने केलेल्या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात भरलेले सिलिंडर आढळून आले. यामुळे विद्यानगर व परिसरात एकच खळबळ उडाली. कारवाईवेळी बनवडीचे पोलीस पाटील रोहित पाटील, तलाठी वैभव शितोळे, कर्मचारी महादेव पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, या कारवाईत जप्त करण्यात आलेले सर्व सिलिंडर भारत गॅस एजन्सीचे असल्याचे समोर आले आहे. एजन्सीच्या वतीने बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला एवढे सिलिंडर कसे देण्यात आले? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विद्यानगर येथील विविध शैक्षणिक संकुलामुळे विद्यानगरसह बनवडी फाटा परिसरात मोठयाप्रमाणात लोकवसाहत वाढली आहे. अशावेळी भर लोकवस्तीत गॅस सिलिंडरचा बेकायदेशीरपणे व्यवसाय करणे अत्यंत धोकादायक असल्याची प्रतिक्रीया रहिवाशांतून व्यक्त होत आहे.
- या प्रकरणात अजून कोणाचा सहभाग आहे का याचा शोध घेणार-साहिला नायकवडी
बनवडी फाटा येथे बेकायदेशीरपणे वाहनांत गॅस भरण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर धडक कारवाई केली. या कारवाईनंतर आम्ही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असून या बेकायदेशीर सिलिंडर व्यवसायाच्या पाठीमागे अजून कोणी आहे का, याचा शोध देखील घेणार असल्याची माहिती पुरवठा निरीक्षक साहिला नायकवडी यांनी दिली.