कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जुगारी अड्ड्यावर छापा...हपापाचा माल गपापा?

01:24 PM Nov 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लाखो रुपयांवर डल्ला मारून हजाराचा हिशेब दाखविल्याचा आरोप

Advertisement

बेळगाव : चार दिवसांपूर्वी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी बेनकनहळ्ळी येथील एका जुगारी अड्ड्यावर छापा टाकून 10 जुगाऱ्यांना अटक केली होती. या अड्ड्यावरून 53 हजार 600 रुपये जप्त केल्याची माहिती देण्यात आली होती. ही कारवाई वादाच्या भोवऱ्यात अडकली असून जुगारी अड्ड्यावरून पोलिसांनी मोठी रक्कम उचलल्याची चर्चा सुरू झाली आहे. 11 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली होती. शाहूनगर येथील प्रफुल्ल पाटील व चव्हाट गल्ली येथील संजय नायक ऊर्फ के. के. संजू हे दोघे अड्डा चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. केवळ बेळगाव शहरच नव्हे तर दांडेली, गोकाक, चंदगड येथील दहा जणांना अटक झाली होती. या कारवाईसंबंधी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तक्रारी जाऊनही ते गप्प कसे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलिसांनी 53 हजार 600 रुपये जप्त केल्याची माहिती दिली असली तरी प्रत्यक्षात ही रक्कम मोठी असल्याची माहिती मिळाली आहे.

Advertisement

पोलिसांनी काही जणांच्या खिशातून दोन ते अडीच लाख रुपये काढून घेतल्याच्या तक्रारी आहेत. संबंधितांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घेतल्याची माहिती मिळाली असून या प्रकरणात लाखो रुपयांचा व्यवहार झाल्याची चर्चा आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे हे बेळगावात रुजू झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत अमलीपदार्थ, मटका, जुगाराचा व्यवसाय खपवून घेणार नाही, अशी स्पष्ट सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्यानंतर या गैरधंद्यांवर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण आले होते. दिवाळीनंतर बेळगाव शहर व उपनगरात मटका व जुगार जोरात सुरू झाला आहे. केवळ काही अधिकारीच नव्हेतर पोलिसांवरही गंभीर आरोप करण्यात आल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. या एका कारवाईतून मिळविलेली रक्कम मोठी आहे. या अड्ड्यावर सापडलेल्या काही जणांची सुटका केल्याचाही आरोप केला जात आहे. यासंबंधी पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांच्याशी संपर्क साधला असता जुगारी अड्ड्यावरील कारवाईच्या नावे गैरप्रकार घडला असेल तर तक्रार दिल्यास आपण याची चौकशी करू, असे त्यांनी सांगितले. गेल्या दोन दिवसांपासून या कारवाईची पोलीस दलात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article