For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माजी मंत्री नागेंद्र, आमदार दद्दल यांना दणका

06:36 AM Jul 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
माजी मंत्री नागेंद्र  आमदार दद्दल यांना दणका
ED team conducted a raid at the house of MLA Basanagouda Daddal in Raichur on Wednesday. -KPN ### Raichur ED raid at MLA house
Advertisement

वाल्मिकी विकास निगम गैरव्यवहार प्रकरणी ईडीचे 18 ठिकाणी छापे : अटकेची शक्यता

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

महर्षि वाल्मिकी विकास निगममधील गैरव्यवहार प्रकरणी माजी मंत्री बी. नागेंद्र आणि निगमचे अध्यक्ष आमदार बसनगौडा दद्दल यांच्यावर बुधवारी ईडीच्या (अंमलबजावणी संचालनालय) अधिकाऱ्यांनी छापे टाकले. उभय नेत्यांची कार्यालये, निवासस्थानांची झडती घेण्यात आली. दरम्यान, बी. नागेंद्र यांच्या स्वीय साहाय्यकाला अटक करण्यात आली आहे तर अन्य दोन सहकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. या प्रकरणात नागेंद्र यांची कोंडी झाली असून अटकेची शक्यता नाकारता येणार नाही.

Advertisement

वाल्मिकी विकास निगममधील सुमारे 185 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी 18 ठिकाणी तडकाफडकी छापेमारी केली. माजी मंत्री नागेंद्र यांच्या बळ्ळारी आणि बेंगळूरमधील कार्यालय, निवासस्थानी छापा टाकला. याशिवाय बेंगळूरच्या एम. जी. रोड शाखेतील युनियन बँकेचे कार्यालय व प्रकरणात सामील असलेल्या आरोपींच्या निवासस्थांनांची झडती घेण्यात आली. आमदार बसनगौडा दद्दल यांचे रायचूरमधील निवासस्थान, कार्यालयावर छापा टाकून ईडीच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली. ईडीचे 80 अधिकारी या कारवाईत सहभागी झाले होते.

मंगळवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास बेंगळूरमधील ईडीच्या कार्यालयात जमा झालेल्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी 6 वाजता राज्यातील विविध ठिकाणी धाडी टाकल्या. माजी मंत्री बी. नागेंद्र यांचे बेंगळूरच्या डॉलर्स कॉलनीतील अपार्टमेंटमधील फ्लॅटवर छापा टाकून कागदपत्रांची पडताळणी केली. नागेंद्र बुधवारी सकाळी एसआयटीसमोर चौकशीला हजर होणार होते. मात्र, सकाळीच त्यांच्या निवासस्थानावर छापा पडला. त्यांचीही ईडीने चौकशी केली. नागेंद्र यांच्याशी संबंधीत तेथील आणखी एका इमारतीवर धाड टाकण्यात आली. ही इमारत कोणाच्या मालकीची आहे, याविषयी ईडीचे अधिकारी माहिती जमा करत आहेत.  आमदार भवनमधील त्यांच्या कार्यालय क्र. 360 मध्येही अधिकाऱ्यांनी तपासणी केली. त्यांच्या बळ्ळारीच्या नेहरु कॉलनीतील निवासस्थानातही तपासणी केली. त्यांचे दोन सहकारी विजयकुमार आणि चेतन यांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. नागेंद्र यांचा स्वीय साहाय्यक हरिश याच्या निवासस्थानावरही धाड टाकून ताब्यात घेतले नंतर त्याला अटक करण्यात आली.

त्याचप्रमाणे रायचूर ग्रामीणचे आमदार बसनगौडा दद्दल यांचे रायचूरमधील निवासस्थान व कार्यालय, बेंगळूरच्या यलहंका येथील निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून तपासणी केली. आमदार भवानमधील त्यांचे कार्यालय क्र. 532 मध्येही तपासणी करण्यात आली.

बँक कर्मचाऱ्यांनाही धक्का

बेंगळूर एम. जी. रोड शाखेच्या युनियक बँकेतील तीन कर्मचाऱ्यांनाही ईडी आणि आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी दणका दिला. या कर्मचाऱ्यांच्या दोन मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. विजयनगर एमआरसीएल लेआऊट येथील दीपा यांच्या निवासस्थानी सीबीआय, बीएसएसबी अधिकाऱ्यांनी धाड टाकली. निवासस्थानाला टाळे ठोकून नोटीस चिकटवली. त्यानंतर तेथे आलेले ईडीचे अधिकारी सीबीआयचा सील पाहून माघारी परतले. 3 जून रोजी दीपा यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा नोंदविला होता. सीबीआयने नोटीस बजावून देखील दीपा हजर झाल्या नव्हत्या. त्यांनी नोटिशीला उत्तरही दिले नव्हते. त्यामुळे त्यांचे निवासस्थान सील करण्यात आले.

बेंगळूर एम. जी. रोड युनियन बँक शाखेच्या प्रमुख सुचिस्मीता यांच्या बेंगळूरमधील निवासस्थानावरही छापा टाकण्यात आला. कोरमंगल येथील यमुना ब्लॉकमध्ये त्यांचे निवासस्थान असून आरबीआर अधिकाऱ्यांनी धाड टाकून ते सील केले. बँकेचे आणखी एक अधिकारी व्ही. कृष्णमूर्ती यांच्या जे. जे. आर. नगममधील निवासस्थानावरही छापा टाकण्यात आला. गैरव्यवहार झाला तेव्हा ते बँकेचे व्रेडिट अधिकारी होते.

निगमच्या कार्यालयावरही धाड

महर्षि वाल्मिकी विकास निगमचे बेंगळूरच्या वसंतनगर येथील कार्यालयावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. सकाळी 6 वाजता तेथे आलेल्या ईडीच्या पथकाने कार्यालयातील कागदपत्रांची पडताळणी केली.

कोणत्या आधारावर कारवाई, हे ठाऊक नाही

वाल्मिकी विकास निगम गैरव्यवहारासंबंधी ईडीने आमदार बी. नागेंद्र व बसनगौडा दद्दल यांच्यावर छापा टाकताक्षणीच ते गैरव्यवहारात सामील असल्याचे म्हणता येणार नाही. कोणत्या आधारावर ईडीने त्यांच्यावर कारवाई केली हे ठाऊक नाही.

- डॉ. जी. परमेश्वर, गृहमंत्री

ईडीने छापा टाकण्याची गरज नव्हती

वाल्मिकी विकास निगममधील गैरव्यवहार प्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी होत आहे. त्यामुळे ईडीने माजी मंत्री बी. नागेंद्र यांचे निवासस्थान आणि इतर ठिकाणी छापे टाकण्याची आवश्यकता नव्हती. तरी सुद्धा हस्तक्षेप करण्यात आला आहे. आमचे एसआयटी अधिकारी समर्थपणे तपास करत आहेत.

- डी. के. शिवकुमार, उपमुख्यमंत्री

Advertisement
Tags :

.