बॅनर्जी यांच्या सल्लागार फर्मवर छापा
ईडीची कारवाई, पुरावे हलविल्याचा केला आरोप
वृत्तसंस्था/कोलकाता
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्या सल्लागार फर्मवर प्रवर्तन निदेशालयाने (ईडी) धाड टाकली आहे. या नाट्यामय घटनेमुळे पश्चिम बंगालमध्ये खळबळ उडाली असून ममता बॅनर्जी यांनी तपासकार्यात अडथळे आणल्याचा आरोप ईडीने केला. ईडीने या प्रकरणी कलकत्ता उच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे. ईडीची धाड पडल्यानंतर ममता बॅनर्जी तेथे पोहचल्या आणि त्यांनी काही फायली तेथून अन्यत्र नेत्या, असा आरोप ईडीने उच्च न्यायालयात केला.
गुरुवारी सकाळीच या धाडीला प्रारंभ करण्यात आला होता. ईडीचे अनेक अधिकारी आणि कर्मचारी ममता बॅनर्जी यांचे निवडणूक विषयक धोरण ठरविण्यात त्यांना साहाय्य करणाऱ्या ‘आय-पीएसी’ या कंपनीच्या कोलकाता येथील कार्यालयात पोहचले. त्यांनी कार्यालयात तसेच या संस्थेचे चालक प्रतीक जैन यांच्या घरात धाडी टाकल्या. पश्चिम बंगालमध्ये 2020 मध्ये मोठा कोळसा घोटाळा उघडकीस आला होता. या घोटाळ्याचा सूत्रधार अनूप माजी हा होता. या घोटाळ्यासंबंधीच्या या फायली आहेत, असाही आरोप ईडीने याचिकेत केला आहे.
ममता बॅनर्जी धाडींच्या स्थानी
सल्लगार संस्थेचे कार्यालय आणि प्रतीक जैन यांचे निवासस्थान येथे ईडीने धाडी टाकल्यानंतर काही वेळातच ममता बॅनर्जी तेथे पोहचल्या आणि त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना विरोध केला. तसेच त्यांनी स्वत:समवेत काही फायली आणि काही इलेक्ट्रॉनिक साधने आणि हार्डडिस्कस् नेल्या. या फायली कोळसा घोटाळ्याशी संबंधित आहेत. त्यामुळे त्यांची तपासणी आवश्यक आहे, असे ईडीचे म्हणणे आहे.
शांतपणे कारवाई
सकाळी ईडीच्या आधिकाऱ्यांनी कारवाईला प्रारंभ केल्यानंतर प्रथम संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. त्यामुळे कारवाई अत्यंत शांततेत केली जात होती. तथापि, ममता बॅनर्जी तेथे उपस्थित झाल्यानंतर त्यांनी गोंधळ करण्यास आरंभ केला. बॅनर्जी यांनी स्वत:समवेत मोठ्या संख्येने पोलीस आणले होते. त्यांनी ईडीच्या अधिकारऱ्यांना कामात अडथळे आणण्यास प्रारंभ केला. पोलिसांच्या साहाय्याने ममता बॅनर्जी यांनी महत्वाचे कागदोपत्री पुरावे, हार्डडिक्सस् आणि इलेक्ट्रॉनिक साधने जबरदस्ती करुन ताब्यात घेतली आणि त्या तेथून निघून गेल्या, अशी माहिती ईडीने अधिकृत वक्तव्यात दिली आहे. प्रतीक जैन यांच्या घरातूनही बॅनर्जी यांनी अनेक महत्वाची कागदपत्रे बळजबरीने केली, असा आरोप आहे.
निवडणुकीशी नाही संबंध
ईडीच्या या धाडींचा संबंध केवळ कोळसा घोटाळ्याशी आहे. येत्या एप्रिल-मे मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीशी या धाडींचा कोणताही संबंध नाही. तसेच त्यांचा संबंध कोणत्याही राजकीय पक्षाशीही नाही. तरीही ममता बॅनर्जी यांनी राज्याच्या पोलीस बळाचा उपयोग करुन कागदपत्रे नेली. हा कोळसा घोटाळा शेकडो कोटी रुपयांचा असून त्याचा संबंध हवाला आणि मनी लाँडरिंग प्रकरणांशी आहे. ईडीच्या दृष्टीने ममता बॅनर्जी यांनी नेलेला पुरावा महत्वाचा आहे.
बॅनर्जी यांचा आरोप
ईडीने प्रतीक जैन यांच्या घरावर धाड टाकून तृणमूल काँग्रेसची गुप्त कागदपत्रे हस्तगत करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. तृणमूल काँग्रेसच्या निवडणूक धोरणाशी संबंधीत कागदपत्रे आणि हार्डडिस्कस् नेण्याचा ईडीचा प्रयत्न होता. ईडीने आमच्या पक्षाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रमुखाच्या घरावर धाड टाकून निवडणूकविषयक कागदपत्रे ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. अनेक कागदपत्रे आणि हार्डडिस्कस् अधिकाऱ्यांनी नेल्या आहेत, असेही प्रतिपादन ममता बॅनर्जी यांनी केले आहे. आता हे प्रकरण कलकत्ता उच्च न्यायालयात पोहचले असल्याने न्यायालयाच्या आदेशाची प्रतीक्षा केली जात आहे.
भाजपचा बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल
ईडीने ममता बॅनर्जी यांच्या विरोधात वक्तव्य केल्यानंतर भारतीय जनता पक्षानेही बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. या पक्षाच्या महिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी बॅनर्जी यांच्यावर सरकारी कामात अडथळे आणण्याचा आरोप केला. प्रचंड संख्येने पोलीस घेऊन त्या स्वत: प्रतीक जैन यांच्या घरात शिरल्या आणि त्यांनी अनेक फायली आणि साधने स्वत:समवेत नेली. हे त्यांचे कृत्य त्यांच्या पदाला न शोभणारे आहे. ज्याअर्थी त्यांनी इतक्या लगबगीने कागदपत्रे तेथून हलविली, त्या अर्थी काहीतरी पाणी निश्चितच मुरत आहे. आता उच्च न्यायालय योग्य ती कारवाई करेल, असे प्रतिपादन मालवीय यांनी केले.
सल्लागाराच्या निवासस्थानी ड्रामा
- ममता बॅनर्जी यांनी धाडींच्या कामात अडथळे आणल्याचा ईडीचा आरोप
- पोलीसांच्या संरक्षणात ममता बॅनर्जी यांनी फायली नेल्याची ईडीची तक्रार
- ईडीकडून बॅनर्जी यांच्या विरोधात कलकत्ता उच्च न्यायालयात याचिका सादर