बाळेकुंद्री खुर्दनजीकच्या ढाब्यावर छापा
बेकायदा दारूसाठा जप्त, तरुणावर एफआयआर
बेळगाव : बाळेकुंद्री खुर्द येथील एका ढाब्यावर छापा टाकून अबकारी अधिकाऱ्यांनी बेकायदा दारूसाठा जप्त केला आहे. शनिवारी ही कारवाई करण्यात आली असून यासंबंधी त्याच गावातील एका तरुणावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राघवेंद्र शेखप्पा मदलभावी (वय 22), राहणार बाळेकुंद्री खुर्द असे त्याचे नाव आहे. त्याच्याजवळून 29 लिटर 160 मिली बेकायदा दारू, 14 लिटर 950 मिली बियर जप्त करण्यात आली आहे. कर्नाटक अबकारी कायदा 1965 च्या कलम 14 व 15 चे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून कलम 32(1), 38(ए) व 43 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अबकारी विभागाचे उपअधीक्षक रवी मुरगोड, दुंडाप्पा हक्की, सुनील पाटील आदींनी ही कारवाई केली आहे. शनिवार दि. 7 जून रोजी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व तालुक्यात दारूविक्री बंदीचा आदेश जारी करण्यात आला होता. पोलीस आयुक्तांनी यासंबंधी लेखी आदेश बजावले होते. दारूविक्री बंदीचा आदेश असूनही कोणत्याही परवानगीशिवाय बाळेकुंद्री खुर्द येथील गावरान ढाब्यामध्ये विक्रीसाठी दारू व बियरचा साठा करून ठेवण्यात आला होता. हा साठा जप्त करण्यात आला असून संबंधितांना नोटीस देण्यात आली आहे.