पंजाब मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी छापा
निवडणूक आयोगाची दिल्लीत कारवाई : अडवणुकीमुळे गोंधळ
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाचे पथक गुरुवारी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे दिल्लीतील निवासस्थान असलेल्या कपूरथला हाऊसमध्ये झडती घेण्यासाठी पोहोचले होते. या कारवाईदरम्यान कपूरथळा हाऊसच्या बाहेर मोठ्या संख्येने सुरक्षा दल तैनात करण्यात आले होते. येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशांचे वाटप सुरू असल्याची तक्रार मिळाल्यानंतर हा छापा टाकण्यात आल्याचे आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. पैशांच्या वाटपाबाबतची तक्रार निवडणूक आयोगाच्या अॅपवर प्राप्त झाली होती.
छापा टाकण्यासाठी भगवंत मान यांच्या निवासस्थानी पोहोचलेल्या रिटर्निंग ऑफिसर ओ. पी. पांडे यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाला सुरुवातीला सुरक्षा रक्षकांनी अडविण्याचा प्रयत्न केल्यानंतर गोंधळ निर्माण झाला. ‘आम्हाला पैशांच्या वाटपाबाबत तक्रार मिळाली आहे. आम्हाला 100 मिनिटांच्या आत तक्रार सोडवावी लागेल. आमची फ्लाइंग स्क्वॉड टीम इथे आली पण त्यांना आत जाऊ दिले नाही, असे पांडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मुख्यमंत्री भगवंत मान यांचा पलटवार
आपल्या निवासस्थानाची तपासणी केल्याबाबत भगवंत मान यांनी निवडणूक आयोगाच्या पवित्र्यावर टीका केली आहे. प्रवेश वर्मा उघडपणे पैसे वाटत आहेत, पण निवडणूक आयोगाला ते दिसत नाही. पण भगवंत मान, अरविंद केजरीवाल आणि सौरभ भारद्वाज यांच्या घरांवर छापे टाकले जातात. दिल्ली पोलिस आणि निवडणूक आयोग भाजपच्या इशाऱ्यावर पंजाबी लोकांना बदनाम करत असून ही भूमिका अत्यंत निषेधार्ह आहे, असे ते म्हणाले.