राहुलचे रणजी पुनरागमन अपयशी
वृत्तसंस्था / बेंगळूर
2025 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे गुरुवारपासून सुरू झालेल्या इलाईट क गटातील सामन्यात यजमान कर्नाटकाने हरियाणा विरुद्ध पहिल्या डावात दिवसअखेर 5 बाद 267 धावा जमविल्या. मात्र भारतीय संघातील यष्टीरक्षक आणि फलंदाज के. एल. राहुलचे रणजीतील पुनरागमन निराशजनक ठरले. या सामन्यात तो केवळ 26 धावांवर बाद झाला. या सामन्यात कर्नाटकाच्या पहिल्या डावात मयांक अगरवालने दमदार फलंदाजी करत 91 धावा झळकविल्या. कर्णधार अगरवाल समवेत राहुलने दुसऱ्या गड्यासाठी 54 धावांची भागिदारी केली. राहुलने 4 चौकारांसह 37 चेंडूत 26 धावा जमविल्या. सलामीचा फलंदाज के. व्ही. अविनेश 17 धावांवर बाद झाला. मात्र आगरवालने दमदार फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. त्याचे शतक 9 धावांनी हुकले. देवदत्त पडिकलने 93 चेंडूत 4 चौकारांसह 43 धावा जमविल्या. सिमरनने 35 धावांचे योगदान दिले. हरियाणातर्फे कंबोजने तसेच ठकराल यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. कर्नाटकाला आपले आव्हान जिंवत ठेवण्यासाठी हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल.
संक्षिप्त धावफलक
कर्नाटक प. डाव 5 बाद 267 (मयांक अगरवाल 91, देवदत्त पडिकल 43, सिमरन 35, के. एल. राहुल 26, कंबोज व ठकराल प्रत्येकी 2 बळी)