राहुल-तेजस्वींमध्ये दुरावा, मोदी-नितीश एकत्र
बिहारमध्ये राजकीय समीकरणे बदलली
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारच्या राजकारणात मैत्री-शत्रुत्वाची नवी कहाणी दिसून येत आहे. महाआघाडीची ‘युवा जोडी’ राहुल गांधी-तेजस्वी यादव जागावाटपाच्या पहिल्या पायरीवरच परस्परांना भिडली आहे. दोघेही काही बोलत नसले तरी दोघांच्या पक्षांचे वरिष्ठ नेते परस्परांनाच लक्ष्य करत आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची जोडी आणि रालोआची टीम बऱ्याचअंशी एकजूट दिसून येत आहे.
काँग्रेस-राजदरम्यान जागावाटपासंबंधीची चढाओढ आता राजकीय संघर्षात बदलत असल्याचे चित्र आहे. सुमारे 12 जागांवर दोन्ही पक्षांनी परस्परांच्या विरोधात उमेदवार उभे केले आहेत. वैशालीपासून लालगंज, कहलगावपासून राजापाकडपर्यंत ‘मैत्रीत कुस्ती’चे दृश्य दिसून येत आहे. काँग्रेसचे दलित नेते राजेश राम यांच्या विरोधात राजदने सुरेश पासवान यांना उमेदवारी दिली आहे. अनेक जागांवर आता मैत्रिपूर्ण लढत होणार असल्याचे पासवान यांनी स्पष्ट पेल आहे. तर राजेश राम यांनी मैत्रिपूर्ण लढत असे काही नसते, लढाई ही लढाईच असते असे वक्तव्य पेले आहे.
काँग्रेसमध्ये ‘तिकीट’संग्राम, राजदमध्ये असंतोष
काँग्रेसच्या निवड समितीच्या अहवालाला ठेंगा दाखवत तिकिटवाटप करण्यात आल्याने असंतोष शिगेला पोहोचला आहे. वरिष्ठ नेते तारिक अन्वर यांनी जो कालपर्यंत काँग्रेसला दुषणे देत होता, त्याला उमेदवारी कशी दिली असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर योगेंद्र यादव यांचे निकटवर्तीय अनुपम यांना उमेदवारी मिळाल्याने काँग्रेस कार्यकर्ते बंडखोरीच्या तयारीत आहेत. राजदमध्ये देखली अनेक जागांवर नाराजी आणि काँग्रेसमध्ये नेतृत्व-संवादाच्या अभावामुळे आघाडीच्या ‘एकते’ला धोका घोंगावत आहे. सद्यस्थितीमुळे दुखावलेले गेलेले बिहार काँग्रेसचे प्रवक्ते आनंद माधव यांनी पक्षाचे सुमारे 150 माजी आमदार, जिल्हाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांसोबत आवाज उठविला आहे.
रालोआत शाह यांनी सांभाळली धुरा
तर प्रारंभिक चढाओढीनंतर रालोआत चांगला ताळमेळ दिसून येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संजद-भाजप आघाडी आणि बूथ व्यवस्थापनाची धुरा स्वत:च्या हातात घेतली आहे. त्यांनी याला ‘निवडणूक शिस्ती’चे नवे मॉडेल ठरविले आहे. शाह यांनी अलीनगर मतदारसंघात मैथिली ठाकूर विरोधात बंडखोरी करू पाहणाऱ्या पप्पू सिंह यांची समजूत काढली, मग शाह यांच्या व्यवस्थापनामुळे भाजपला पुन्हा आघाडी मिळविण्याची संधी मिळाली आहे.
मोदींच्या 12 भव्य सभा, राहुल गायब
पंतप्रधान मोदी हे बिहारमध्ये 12 भव्य जाहीरसभांना संबोधित करणार आहेत. 23 ऑक्टोबर रोजी सासाराम, भागलपूर, गया येथे सभा होतील. तर 28 ऑक्टोबर रोजी पाटणा, मुजफ्फरपूर, दरभंगा येथे सभा असतील. 1 नोव्हेंबरला पूर्व चंपारण्य, समस्तीपूर आणि छाप्रा येथे मोदींची सभा होणार आहे. 3 नोव्हेंबर रोजी पश्चिम चंपारण्य, सहरसा आणि अररिया येथे मोदी सभेला संबोधित करणार आहेत. या सभांमुळे रालोआचे प्रचार अभियान निर्णायक वळण घेणार आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी यांनी निवडणुकीपूर्वी व्होटचोरीचा मुद्दा उपस्थित करत वातावरण निर्मिती केली होती, परंतु आता बिहारपासून त्यांनी अंतर राखल्याने काँग्रेस आणि महाआघाडीवर त्याचा प्रतिकूल प्रभाव पडला आहे.