Rahul Patil: भाजप की राष्ट्रवादीत प्रवेश करणार? राहुल पाटलांनी थेटचं सांगितलं, मी...
सहकारात राजकारण नाही, राहुल पाटील सभेच स्पष्टच म्हणाले...
By : एस. पी. चौगले
वाकरे : आपण भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही, मी काँग्रेस सोबतच आहे अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील (सडोलीकर) यांनी दिली. साबळेवाडी (ता. करवीर) येथील श्रीकृष्ण दूध संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशबाबत त्यांना पत्रकारांनी छेडले असता त्यांनी स्पष्ट वक्तव्य केले.
यावेळी राहुल पाटील म्हणाले, भोगावती सहकारी साखर कारखान्याला एनसीडीसीकडून कर्ज मिळावे यासाठी आपण यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन भोगावतीला एनसीडीसीचे कर्ज द्यावे अशी विनंती केली.
त्यांनी याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे आपण मुंबईत या दोघांची भेट घेतली आणि भोगावतीला एनसीडीसीकडून कर्ज देण्यासाठी मदत करावी अशी विनंती केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र भाजप अथवा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचा खुलासा त्यांनी यावेळी केला.
सहकारात राजकारण नाही
करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांना भोगावती कारखान्याला एनसीडीसीकडून कर्ज मिळावे यासाठी पत्र द्यावे अशी आपण विनंती केली, त्यांनी सहकारात राजकारण करत नसल्याचे सांगून त्वरित पत्र दिल्याचे राहुल पाटील यांनी सांगितले.