अॅपेक्स बँक संचालकपदी राहुल जारकीहोळी
बेळगाव : पालकमंत्री सतीश जारकीहोळी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (बीडीसीसी) अध्यक्ष आण्णासाहेब जोल्ले आदींच्या इच्छेनुसार बेळगाव जिल्ह्यातून अॅपेक्स बँक संचालकपदी राहुल जारकीहोळी यांची निवड करण्यात आल्याची माहिती बेमुलचे अध्यक्ष व आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी दिली. येथील धर्मनाथ भवनात गुरुवारी माध्यमांसमोर ते बोलत होते. अॅपेक्स बँक संचालकपदी निवड झाल्याने राहुल जारकीहोळी यांची जबाबदारी आणखी वाढली आहे. त्यामुळे त्यांना प्रत्येक सभेमध्ये सहभागी होऊन बीडीसीसी बँकेच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रत्येक पाच वर्षांतून बीडीसीसी बँकेमार्फत अॅपेक्स बँकेवर एका संचालकाची नेमणूक करण्यात येत असते.
यापूर्वी जिल्ह्यातून आमदार लक्ष्मण सवदी यांनी अॅपेक्स बँकेच्या संचालक पदावर अधिक वर्षे काम केले आहे. आण्णासाहेब जोल्ले यांची बीडीसीसी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वात राहुल जारकीहोळी यांची अॅपेक्स बँकेसाठी निवड करण्यात आल्याचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी सांगितले. राहुल जारकीहोळी म्हणाले, बीडीसीसी बँक अध्यक्ष आण्णासाहेब जोल्ले, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, आमदार भालचंद्र जारकीहोळी यांसह जिल्ह्यातील अन्य नेतेमंडळींच्या सल्ल्यानुसार माझी अॅपेक्स बँक संचालकपदी निवड करण्यात आली असून या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत आहे. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनानुसार कार्य करीत जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करेन. यावेळी बीडीसीसी बँक अध्यक्ष आण्णासाहेब जोल्ले, संचालक चन्नराज हट्टीहोळी उपस्थित होते.