‘एक व्यक्ती, एक पद’चा राहुल गांधींचा सूर
अध्यक्ष झाल्यास अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागणार
कोची / वृत्तसंस्था
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी कोचीमध्ये पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारांबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या अध्यक्ष आणि मुख्यमंत्री म्हणून कायम राहण्याच्या इच्छेवर बोलताना उदयपूर अधिवेशनात एक व्यक्ती-एक पदाबाबत घेतलेला निर्णय बंधनकारक राहील, असे राहुल गांधी म्हणाले. तथापि, गुरुवारी सकाळीच पक्षाचे अध्यक्षपद ‘एक व्यक्ती-एक पदा’च्या कक्षेत येत नसल्याचे म्हणाले होते. तसेच इतिहासात काँग्रेसचा एकही अध्यक्ष मुख्यमंत्री झाला नसल्यामुळे पक्षसंघटनेला योग्य निर्णय घ्यावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीसाठी आचारसंहिता जारी झाल्यानंतर आता निवडणूक अर्ज दाखल करण्याची घिसाडघाई सुरू होणार आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये याबाबत विविध पातळीवर चर्चा सुरू झाल्याचे दिसून येत आहेत. पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीतही बैठकांचा सपाटा सुरू आहे. सध्या गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीला अध्यक्षपदाची संधी मिळण्याचे स्पष्ट संकेत दिसून येत आहेत. पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या निमित्ताने केरळमध्ये आहेत. येत्या एक-दोन दिवसात वेळात वेळ काढून ते दिल्लीला भेट देणार असल्याचे समजते. तत्पूर्वी ‘काँग्रेस अध्यक्ष हे केवळ संघटनात्मक पद नसून ते एक वैचारिक पद आणि विश्वासार्ह व्यवस्था आहे. काँग्रेस अध्यक्ष बनणाऱयाला पक्षाच्या विचारधारेनुसार देशाचे प्रतिनिधित्व करावे लागते’, असे राहुल गांधी यांनी कोचीमध्ये स्पष्ट केले आहे.
पायलट यांच्याकडे मुख्यमंत्रीपद?
सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्याच्या प्रश्नावर गेहलोत यांनी सावध वक्तव्य केले आहे. राजस्थानमधील स्थिती पाहून हायकमांड त्याचा अभ्यास करेल आणि आमदारांच्या भावना काय आहेत ते पाहतील. पुढची निवडणूक आपण जिंकू हे ध्यानात ठेवावे लागेल, कारण आता काँग्रेसकडे फक्त राजस्थान हे मोठे राज्य आहे. आमच्यासाठी हा निर्णयही अत्यंत नाजूक निर्णय असेल आणि तो अत्यंत काळजीपूर्वक घ्यावा लागेल, असे गेहलोत म्हणाले.