निवडणूक आयोगाविरुद्ध राहुल गांधींची नवी मोहीम
मत चोरी’च्या तक्रारीसाठी वेबसाईट, मिस्ड कॉल नंबर जारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘मत चोरी’ विरोधात नवी मोहीम सुरू केली आहे. यासाठी त्यांनी एक वेबसाईट सुरू करतानाच निवडणुकीत सुरू असलेल्या कथित अनियमिततांविरुद्धच्या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन जनतेला केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर यासंबंधी भाष्य केले आहे. मतचोरी हा ‘एक व्यक्ती, एक मत’ या मूलभूत लोकशाही तत्त्वावर हल्ला आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, भाजप प्रवक्ते अमित मालवीय यांनी राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे आवाहनानुसार घोषणापत्र दाखल करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे.
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यामध्ये त्यांनी मतचोरी हा लोकशाही तत्त्वावर हल्ला असल्याचे म्हटले आहे. ‘मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी अचूक मतदारयादी आवश्यक आहे. निवडणूक आयोगाने पारदर्शकता दाखवावी आणि डिजिटल मतदारयादी सार्वजनिक करावी, जेणेकरून जनता आणि राजकीय पक्ष स्वत: त्याची पडताळणी करू शकतील. तुम्हीही आमच्यात सामील होऊन या मागणीला पाठिंबा देऊ शकता. प्ttज्://न्दाम्प्दग्.ग्ह/ाम्dास्aह् ला भेट द्या किंवा 9650003420 वर मिस्ड कॉल द्या’ असे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी हा लढा सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
‘सत्ता गमावल्याने निराधार विधाने : भाजप
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर भाजप खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय राजकारणातील ‘सदाबहार तरुण’ देशाच्या संवैधानिक संस्थांची प्रतिमा सतत खराब करण्यात गुंतल्याचे टिप्पणी त्यांनी केली. सुधांशू त्रिवेदी यांनी राहुल गांधींची तुलना नाझी जर्मनीचे प्रचारमंत्री गोबेल्सशी करताना सत्ता गमावण्याच्या निराशेतून ते खोटी आणि निराधार विधाने करत असल्याचा आरोप केला.