For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मित्राच्या पार्थिवाबरोबरच राहुल गांधींचा प्रवास

04:08 PM Dec 17, 2024 IST | Radhika Patil
मित्राच्या पार्थिवाबरोबरच राहुल गांधींचा प्रवास
Rahul Gandhi's journey with his friend's body
Advertisement

महाबळेश्वर : 
आपले मित्र रायन बनाजी यांच्या अंत्यविधीसाठी संसदेचे विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी हे सोमवारी महाबळेश्वर येथे आले होते. मित्राच्या कुटूंबियांचे सांत्वन करून धार्मिक विधी पूर्ण होईपर्यंत ते बनाजी यांच्या बंगल्यातच थांबले होते. विशेष म्हणजे ज्या शववाहिकेतून रायन बनाजी यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेहण्यात आले त्याच शववाहिकेतून राहुल गांधी यांनी प्रवास केला. त्यानंतर रायन बनाजी यांच्यावर पारशी स्माशाभूमीत खा. राहुल गांधी यांच्या उपस्थितीतच दफनक्रिया पार पडली. अंत्यसंस्काराचे सर्व सोपस्कार उरकुनच खा. गांधी यांनी कुटूंबियांचा निरोप घेतला.

Advertisement

मुंबई येथील प्रसिध्द नेत्रतज्ञ डॉ. बनाजी यांनी खा. राहुल गांधी यांचे डोळयांची तपासणी करून गांधी यांच्या डोळयावर उपचार केले होते. तेव्हापासुन गांधी व बनाजी कुटूंबियांमधील संबंध अधिकच दृढ, कौटुंबिक नाते झाले होते. हे दोन्ही घरांनी जपले होते. डॉ. बनाजी यांचे चिरंजीव रायन हे पोतुर्गालची राजधानी लिस्बन येथे होते. ते नियमित जिमला जात होते. काही दिवसांपुर्वी जीममध्ये व्यायाम करीत असताना रायन बनाजी यांना हार्टअटॅक आला व त्यांतच त्यांचे निधन झाले. रायन यांनी निधनापुर्वी आपले अंत्यविधी महाबळेश्वर येथे व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती. मुलाच्या इच्छेनुसार डॉ. बनाजी यांनी आपल्या मुलाचे पार्थीव महाबळेश्वर येथील शापुर हॉल या बंगल्यावर आणले. 16 तारखेला दुपारी साडे बारा वाजता रायन बनाजी यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील असे यापुर्वीच जाहीर करण्यात आले होते. आपल्या मित्राच्या अंत्यसंस्कारासाठी खा. राहुल गांधी यांनी महाबळेश्वर येथे जाण्याचा निर्णय घेतला.

महाबळेश्वर दौऱ्यासाठी 15 तारखेला रात्री खा. राहुल गांधी यांचे पुणे येथे आगमन झाले. आज सकाळी पुण्याहुन प्रचंड पोलीस बंदोबस्तात खा. राहुल गांधी यांचा महाबळेश्वरचा प्रवास सुरू झाला. रायन बनाजी यांचे पार्थीव ठेवलेल्या बंगल्यावर सकाळपासुनच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता खा. राहुल गांधी यांचे महाबळेश्वर येथे आगमन झाले. त्यांनी शापुर बंगला येथील रायन बनाजी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले व बनाजी यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. पारशी धर्मानुसार खा. राहुल गांधी यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले. पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी व अंत्यविधीत सहभागी होण्यासाठी नातेवाईकांची शापुर बंगल्यावर गर्दी झाली होती. शहरातील पारशी समाजबांधव हे देखिल सकाळपासुनच शापुर बंगल्यावर उपस्थित होते तर शहरातील काही प्रतिष्ठीत देखिल पार्थीवाच्या दर्शनासाठी शापुर बंगल्यावर हजेरी लावत होते.

Advertisement

दुपारी बारा वाजता रायन बनाजी यांचे पार्थीव एका शववाहिकेतुन पारशी स्मशानभूमीकडे हलविण्यात आले. खा. राहुल गांधी हे स्वत: आपल्या मित्राच्या पार्थिवाबरोबर त्याच शववाहिकेतुन स्मशानभूमीपर्यत गेले. त्या ठिकाणी पारशी समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे रायन बनाजी यांच्या पार्थीवावर दफन संस्कार करण्यात आले. अंतिम संस्कारानंतर खा. राहुल गांधी हे पुन्हा डॉ. बनाजी यांच्या बंगल्यावर गेले. तेथे पुन्हा त्यांनी बनाजी यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले व त्यांना दिलासा दिला. दुपारी तीन वाजता खा. राहुल गांधी हे पुण्याच्या दिशेने रवाना झाले.

जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना न येण्याच्या सूचना
खा. राहुल गांधी यांचा हा दौरा अत्यंत खाजगी होता. यावेळी कोणत्याही कॉँगेस नेत्यांनी महाबळेश्वर येथे भेटु नये अशी सक्त ताकिद त्यांनी दिल्याने. आज त्यांच्या दौऱ्या वेळी सातारा जिल्ह्यातील काँगेसचे नेते व पदाधिकारी हे महाबळेश्वरकडे फिरकले देखिल नाहीत.

रायन बनाजी यांच्यावर दफनक्रिया
ब्रिटीश काळापासुनच पारशी समाजोच लोक येथे वास्तव्याला होते. ब्रिटिश काळापासुनच पारशी समाजाची येथे स्मशानभूमी होती. अंत्यसंस्कार करण्यासाठी एक विहीर आणि गिधाडं येथे होती, अशी माहिती जुनी जाणती मंडळी देत आहेत. आता मात्र पारशी समाजाची लोकसख्या खूप कमी झाली आहे. काही बोटावर मोजण्याइतपत पारशी कुटूंबे येथे आहेत. या समाजाची लोकसंख्या कमी झाल्याने गिधाडं नष्ट झाली. गिधाडं नसल्याने आता येथे पारशी समाजाच्या वतीने दफन विधी पार पडतो. आज देखिल रायन बनाजी यांच्यावर दफनक्रिया पार पडली.

Advertisement
Tags :

.