राहुल गांधींचा पुन्हा ‘फिक्सिंग बॉम्ब’
महाराष्ट्राप्रमाणेच बिहार निवडणुकीतही ‘हेराफेरी’ होणार असल्याचा दावा : भाजपसह निवडणूक आयोगाकडून पलटवार
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गेल्यावर्षी महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आरोप पुन्हा एकदा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राहुल गांधींच्या विधानानंतर देशभर राजकीय गोंधळ सुरू होताच निवडणूक आयोगाने शनिवारी त्यांचे दावे फेटाळून लावताना ‘मतदारांकडून अनुकूल निवडणूक निकाल न मिळाल्याने निवडणूक आयोगाची बदनामी करणे पूर्णपणे हास्यास्पद आहे’, असे स्पष्ट केले. तर भाजपनेही ‘केवळ दुसऱ्यावर आरोप न करता काँग्रेसने आपला पराभव मान्य करावा’, अशी खोचक टिप्पणी केली आहे.
काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत ‘मॅच फिक्सिंग’ झाल्याचा दावा करतानाच आता आगामी बिहार निवडणुकीतही हेराफेरीची पुनरावृत्ती होईल, असे म्हटले आहे. राहुल गांधींच्या या विधानावर निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी ताबडतोब प्रतिक्रिया दिली आहे. ‘कोणीही चुकीची माहिती पसरवणे हे निवडणुकीदरम्यान राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या हजारो प्रतिनिधींची बदनामी आहे. तसेच या मोठ्या कामासाठी अथक परिश्रम करणाऱ्या निवडणूक कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचवणारे आहे. तसेच महाराष्ट्राच्या मतदार यादीबद्दल केलेले निराधार आरोप कायद्याच्या राज्याचा अनादर आहेत, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजपवर आरोप करताना ते म्हणाले की भाजपने मॅच फिक्सिंगसारख्या निवडणुकांमध्ये हेराफेरी केली. एका दैनिकामध्ये प्रकाशित लेख शेअर करताना, राहुल गांधी यांनी निवडणुकांवर प्रभाव पाडण्याची पाच कारणे सांगितली आहेत. त्यांनी ‘एक्स’वर यासंबंधी पोस्ट टाकत निवडणूक कशी चोरायची? 2024 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लोकशाहीमध्ये हेराफेरी करण्याचा एक ब्लूप्रिंट होता’ असे ट्विट केले. तसेच यातील पाच टप्प्यांचाही स्पष्टपणे उल्लेख केला. त्यात पहिला टप्पा - निवडणूक आयोगाच्या नियुक्तीसाठी पॅनेलमध्ये हेराफेरी, दुसरा टप्पा - मतदार यादीत बनावट मतदार जोडणे, तिसरा टप्पा - मतदानाची टक्केवारी वाढवणे, चौथा टप्पा - भाजपला जिंकायचे असेल तिथेच बनावट मतदानाला लक्ष्य करणे, पाचवा टप्पा - पुरावे लपवणे यावरही भाष्य केले.
महाराष्ट्र निवडणुकांवर प्रश्न उपस्थित
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांवरून राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधला. महाराष्ट्रात भाजप इतका हताश का होता हे पाहणे कठीण नाही? पण ही हेराफेरी मॅच फिक्सिंगसारखी आहे. फसवणूक करणारा पक्ष सामना जिंकू शकतो, परंतु संस्थांना नुकसान पोहोचवतो.’ असे ते म्हणाले. असे फसवे निकाल जनतेचा विश्वास नष्ट करतात. सर्व संबंधित भारतीयांनी पुरावे पाहून स्वत: निर्णय घ्यावा, उत्तरे मागावीत, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले.
निवडणूक आयोगावरही आरोप
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राहुल गांधी यांनी अमेरिकेतील बोस्टन येथे एका कार्यक्रमादरम्यान निवडणूक आयोग आता निष्पक्ष राहिलेला नाही, त्याने तडजोड केली आहे, असा आरोप केला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या मतदानाच्या आकडेवारीचा हवाला देत त्यांनी मतदानाच्या अंतिम दोन तासात लाखो मते टाकणे भौतिकदृष्ट्या अशक्य असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. ‘सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत निवडणूक आयोगाने आकडा दिला आणि नंतर 5.30 ते 7.30 वाजेपर्यंत 65 लाख अधिक मते टाकण्यात आली. जर मतदाराला मतदान करण्यासाठी सुमारे तीन मिनिटे लागली तर इतक्या कमी वेळात इतक्या कमी वेळात मतदान करता येणार नाही. याचा अर्थ असा होऊ शकतो की मध्यरात्रीपर्यंत रांगा होत्या, जे खरे नाही.’ असे राहुल गांधी म्हणाले होते.
भाजपचा जोरदार पलटवार
भाजपने राहुल गांधींच्या दाव्यांना अपमानजनक म्हटले आहे. ‘राहुल गांधी देशाच्या संस्थांना बदनाम करण्याच्या त्यांच्या लज्जास्पद कृत्यांकडे परतले आहेत. निवडणूक आयोगाने या मुद्यांवर वारंवार सविस्तरपणे लक्ष दिले आहे,’ असे भाजप नेते तुहिन सिन्हा म्हणाले. तसेच राहुल गांधींच्या या विधानानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जोरदार पलटवार केला. राहुल गांधींनी बिहारमध्ये आपला पराभव स्वीकारला आहे. मी नेहमीच म्हटले आहे की जोपर्यंत राहुल गांधी वस्तुस्थिती समजून घेत नाहीत आणि स्वत:शी खोटे बोलणे थांबवत नाहीत तोपर्यंत काँग्रेस जिंकू शकत नाहीत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी राहुल गांधींना उत्तर देताना म्हणाले.