राहुल गांधींकडून संघाशी तुलना, डावे संतप्त
बिहार निवडणुकीपूर्वी ‘इंडी’ आघाडीत वाढले टेन्शन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बिहारमध्ये आगामी काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. रालोआ आणि महाआघाडी दोन्हींमध्ये घटक पक्षांदरम्यान जागावाटपावरून चर्चा सुरू आहे. याचदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि माकप यांची विचारसरणी एकसारखीच आहे असे वक्तव्य राहुल यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर इंडी आघाडीत फूट पडणार असल्याचे मानले जात आहे. इंडी आघाडीच्या व्हर्च्युअल बैठकीत हा मुद्दा डाव्या पक्षांच्या नेत्यांकडून जोरदारपणे उपस्थित करण्यात आल्याचे समजते.
राहुल गांधींनी केरळच्या कोट्टायम येथे माजी मुख्यमंत्री ओमन चांडी यांच्या स्मृतिदिनी आयोजित एका सभेला संबोधित केले होते. मी संघ आणि माकप दोन्हींच्या विचारसरणींशी समान स्वरुपात लढतो. या दोन्ही विचारसरणींमध्sय लोकांबद्दल संवेदनाच नाही हीच माझी सर्वात मोठी तक्रार आहे. राजकारणात असण्याचा अर्थ लोकांच्या भावना समजून घेणे, त्यांचे म्हणणे ऐकणे असते असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.
डाव्या पक्षांचा आक्षेप
इंडी आघाडीच्या व्हर्च्युअली बैठकीत भाकप नेते डी. राजा यांनी अशाप्रकारच्या टिप्पणी कॅडर्समध्ये भ्रम पसरवितात आणि आघाडीच्या एकतेला नुकसान पोहोचवू शकतात असे कुणाचाही नामोल्लेख न करताना म्हटले आहे. इंडी आघाडीचा नारा हा ‘देश बचाओ, भाजप हटाओ’ होतात, परस्परांमधील मतभेद वाढवा असा नव्हता अशी आठवण एका अन्य नेत्याने करून दिली आहे.
राहुल गांधींच्या टिप्पणीवर माकप महासचिव एम.ए. बेबी यांनी एक तीव्र व्हिडिओ संदेश जारी केला. राहुल गांधींनी माकपची तुलना संघासोबत करणे दुर्दैवी आहे. यातून राहुल गांधी यांना केरळ आणि भारताच्या राजकारणाची वस्तुस्थिती समजत नसल्याचे स्पष्ट होते. 2004 मध्ये काँग्रेस सरकार डाव्या पक्षांच्या समर्थनानेच स्थापन झाले होते. डॉ. मनमोहन सिंह यांचे सरकार माकपच्या पाठिंब्याशिवाय सत्तेवर येऊ शकले नसते अशी आठवण बेबी यांनी करून दिली आहे.
तसेच बेबी यांनी राहुल गांधींच्या वायनाड येथून निवडणूक लढविण्याच्या मुद्द्यावर उपरोधिक टिप्पणी केली. राहुल गांधींना वायनाड येथे भाजप किंवा संघाचे नव्हे तर भाकप उमेदवाराचा सामना करावा लागला होता असे बेबी यांनी नमूद केले आहे. राहुल गांधी यांनी वायनाड येथून भाकप उमेदवार एनी राजा यांच्या विरोधात विजय मिळविला होता, परंतु त्यांनी हा मतदारसंघ सोडून देत रायबरेलीचे सदस्यत्व राखले होते. त्यानंतर वायनाड येथे झालेल्या पोटनिवडणुकीत प्रियांका वड्रा विजयी झाल्या होत्या.
टीका होईल, परंतु तुलना नको
डावे पक्ष काँग्रेसच्या आर्थिक धोरणांवर टीका करतात. परंतु कधीच काँग्रेसची तुलना भाजप किंवा संघासोबत केली नाही. आम्ही काँग्रेसवर टीका स्वतंत्र स्वरुपात करतो, परंतु कधीच काँग्रेसला संघ किंवा भाजपसारखे संबोधिले नाही असे एम.ए. बेबी यांनी म्हटले आहे. काँग्रेस आणि माकप हे राष्ट्रीय स्तरावर इंडी आघाडीचा हिस्सा आहेत, परंतु केरळमध्ये दोन्ही पक्ष परस्परांच्या विरोधातील आघाडीचे नेतृत्व करतात. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट (यूडीएफ) आणि डाव्यांच्या नेतृत्वाखालील लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट (एलडीएफ) यांच्या आव्हानादरम्यान भाजप राज्यातील स्वत:चा प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. तर बिहारमध्ये महाआघाडीत डावेपक्षही सामील आहेत.