राहुल गांधींचा लेख, राजघराणी नाराज
भारतमातेचा अपमान थांबवा : राहुल गांधींना इतिहासाबद्दल अज्ञान
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या लेखावरून वाद निर्माण झाला आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दीया कुमारी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. राजघराण्यांची प्रतिमा राहुल गांधींनी मलीन केली आहे. राहुल गांधी यांनी प्रथम भारतमातेचा अपमान करणे बंद करावे. राहुल गांधी हे समाजात फूट पाडू पाहत असल्याचा आरोप सिंधिया आणि दीया कुमारी यांनी केला आहे.
राहुल गांधी यांनी लेखात केलेल्या दाव्याची मी कठोर शब्दांत निंदा करतो. राजघराण्यांनी लाच स्वीकारल्याचे राहुल गांधींनी नमूद पेले आहे. परंतु राहुल गांधींना इतिहासाचे कुठलेच ज्ञान नाही. राहुल गांधींनी प्रथम ज्ञान मिळवावे, ते खासदार आहेत. अशाप्रकारचे आरोप करण्यापूर्वी त्यांनी वस्तुस्थिती जाणून घ्यायला हवी होती, असे दीया कुमारी यांनी सुनावले आहे.
राजघराण्यांचे योगदान सर्वजण जाणतात. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आवाहनावर भारताचे एकीकरण झाले होते, तेव्हा सर्व माजी राजघराण्यांनी पुढे येत मिळवून नवा भारत निर्माण करू, अशी भूमिका घेतली होती. राहुल गांधी यांना इतिहासच माहित नसल्याने किंवा ते राजघराण्यांची प्रतिमा जाणूनबुजून मलीन करू पाहत आहेत. समाजात फूट पाडण्याची त्यांची इच्छा आहे, हीच त्यांची सवय राहिली आहे. काँग्रेस पक्षाने नेहमीच समाज आणि जातींना विभागले आहे. राहुल गांधींचा लेख याचेच एक उदाहरण असल्याची टीका दीया कुमारी यांनी केली.
अज्ञानाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना चांगलेच सुनावले आहे. राहुल गांधी यांनी स्वत:च्या एका लेखात व्यापार आणि बाजाराशी निगडित स्वत:चे विचार मांडले होते. यात त्यांनी रालोआ सरकारवर टीकाही केली होती. आता राहुल गांधींच्या या लेखावर सिंधिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. द्वेष विकू पाहणाऱ्यांना भारतीय गौरव आणि इतिहासावर व्याख्यान देण्याचा कुठलाच अधिकार नाही. भारताच्या समृद्ध इतिहासाविषयी राहुल गांधींचे अज्ञान आणि त्यांच्या वसाहतवादी मानसिकतेने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. राहुल गांधी हे जर राष्ट्राच्या उत्थानाचा दावा करत असतील तर त्यांनी भारतमातेच अपमान करणे बंद करावे. महादजी सिंधिया, युवराज बीर टिकेंद्रजीत, राणी वेलु नचियार यासारख्या खऱ्या भारतीय नायकांविषयी त्यांनी जाणून घ्यावे असे सिंधिया यांनी राहुल गांधी यांना सुनावले आहे.
राहुल गांधींच्या लेखात काय?
स्वत:च्या व्यापारी शक्तीमुळे नव्हे तर ईस्ट इंडिया कंपनीने भारताचा आवाज स्वत:च्या विळख्याद्वारे चिरडला होता. कंपनीने राजा आणि महाराजांना घाबरविले-धमकाविले. राजा-महाराजांना लाच देत भारतावर कब्जा केला होता. मूळ ईस्ट इंडिया कंपनी 150 वर्षांपूर्वी समाप्त झाली होती. परंतु तेव्हा जी भीती निर्माण झाली होती, ती आता पुन्हा परतली असल्याचा दावा राहुल गांधी यांनी लेखात केला होता. एकाधिकारवाद्यांच्या एका नव्या समुहाने याची जागा घेतली आहे. त्यांनी अपार धन जमा केले आहे. आमच्या संस्था आता आमच्या लोकांच्या नव्हे तर एकाधिकारवाद्यांच्या इशाऱ्यावर चालतात. लाखो व्यवसाय नष्ट झाले असून भारत स्वत:च्या युवांसाठी रोजगार निर्माण करू शकत नसल्याचा दावा राहुल यांनी केला होता.