पक्षविरोधी कारवायांवर राहुल गांधींचा संताप
गुजरात दौऱ्यात नेत्यांना सज्जड दम
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी आपल्या गुजरात दौऱ्यात पक्ष संघटनेची बैठक घेत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना संबोधित केले. या बैठकीत ते पक्षातील नेत्यांवर चांगलेच भडकले. ‘काँग्रेस पक्षातील काही नेते आतून भाजपला मदत होईल, असे काम करत आहेत. अशा 10, 15, 20 किंवा 30 नेत्यांना पक्षातून बाहेर काढावे लागले तरी चालेल...’, असा स्पष्ट इशारा राहुल गांधी यांनी दिला. तसेच गुजरातमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा नक्की विजय होणार असा आशावाद व्यक्त करतानाच त्यांनी पक्ष संघटनेतील मरगळ झटकून टाकण्याचे आवाहन केले.
अहमदाबाद येथे आयोजित केलेल्या बैठकीत राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी गुजरातमधील व्यापारी, छोटे व्यावसायिक, शेतकरी, मजूर, विद्यार्थी यांना आता पर्याय हवा आहे असे सांगत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न केला. सध्या पक्षात पसरलेली मरगळ झटकण्याची आवश्यकता असून नेत्यांमध्ये एकरुपता दिसून आली पाहिजे असे ते म्हणाले. पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या नेत्यांना दूर करून सर्वांनी एकीने काम केल्यास पक्षसंघटना मजबूत होईल, असा दावा राहुल गांधी यांनी केला.
निम्म्या नेत्यांची भाजपशी सलगी
गुजरातमधील काँग्रेस नेतृत्वात दोन प्रकारचे लोक आहेत. एकमेकांमध्ये मतभेद आहे. काही लोक असे आहेत जे जनतेसोबत उभे राहतात आणि त्यांच्या हृदयात काँग्रेसची विचारसरणी आहे. दुसरे म्हणजे जे जनतेपासून तुटलेले आहेत, दूर बसलेले आहेत आणि त्यापैकी निम्मे भाजपशी संबंध ठेवणारे आहेत. या दोन्ही गटांना वेगळे करण्याची जबाबदारी माझी आहे असे वक्तव्य करतानाच काँग्रेसमध्ये नेत्यांची कमतरता नाही, असेही ते पुढे म्हणाले.
नवीन नेतृत्वावर विश्वास
राहुल गांधी गुजरातमध्ये नवीन नेतृत्वाला प्रोत्साहन देण्याबद्दलही बोलले. ते म्हणाले की, भाजप समर्थक गेल्यानंतर पक्षात नवीन नेते पुढे आणले जातील, ज्यामध्ये बूथ पातळीपासून ते ब्लॉक, जिल्हा आणि राज्य पातळीपर्यंतचे नेते असतील. काँग्रेसमध्ये नेत्यांची कमतरता नाही. परंतु त्यांच्या नेत्यांना बढती देण्यासाठी त्यांनी अट घातली होती की ज्यांच्या हृदयात काँग्रेस म्हणजेच काँग्रेसची विचारसरणी आहे अशा नेत्यांनाच बढती दिली पाहिजे. अशा लोकांनाच संघटनेचे नियंत्रण मिळायला हवे, असे ते म्हणाले.