‘वायनाड’मधून राहुल गांधी लढणार
काँग्रेसने डाव्या पक्षांसमोर मांडली भूमिका
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या चर्चेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी कोठून निवडणूक लढवणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचदरम्यान राहुल गांधी पुन्हा केरळमधील वायनाड मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘इंडिया’ आघाडीचा भाग असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (सीपीआय) माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना वायनाडची जागा सोडण्यास सांगितले होते. वायनाडची जागा डाव्यांसाठी सोडली पाहिजे, असे सीपीआयने म्हटले आहे. मात्र, येथून राहुल गांधी निवडणूक लढवतील, असे काँग्रेसने डाव्या पक्षातील नेत्यांना कळवल्याचे सांगण्यात आले. राहुल गांधी यांनी 2019 मध्ये उत्तर प्रदेशातील अमेठी आणि केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. ते अमेठीतून निवडणूक हरले, पण वायनाडमधून विजयी झाले होते. अमेठीबाबत अद्याप काँग्रेसने कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही.