For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राहुल गांधी वायनाड, थरूर तिऊअनंतपुरममधून लढणार

06:13 AM Mar 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
राहुल गांधी वायनाड  थरूर तिऊअनंतपुरममधून लढणार
Advertisement

काँग्रेसची 39 उमेदवारांची पहिली यादी जाहीर : कर्नाटकमधील सात उमेदवारांची घोषणा,

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने शुक्रवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत 39 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून त्यात कर्नाटकमधील सात जणांचा समावेश आहे. महाराष्ट्र आणि गोव या राज्यातील उमेदवारांची घोषणा अद्याप झालेली नाही. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी केलेल्या घोषणेनुसार, राहुल गांधी वायनाडमधून, भूपेश बघेल राजनांदगावमधून, राजेंद्र साहू दुर्गमधून, विकास उपाध्याय रायपूरमधून निवडणूक लढवणार आहेत. तसेच तिऊअनंतपुरममधून शशी थरूर, मेघालयातून व्हिन्सेंट पाला आणि त्रिपुरा पश्चिम मतदारसंघातून आशिष साहा यांची नावे समोर आली आहेत.

Advertisement

गुरुवार, 7 मार्च रोजी झालेल्या बैठकीनंतर पहिली यादी जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीतील 39 जणांपैकी 15 ‘सामान्य’ उमेदवार असून 24 उमेदवार एससी-एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्याक प्रवर्गातील आहेत. त्यामधील 12 उमेदवार 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. पहिल्या यादीत छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप, मेघालय, नागालँड, सिक्कीम, तेलंगणा आणि त्रिपुरा या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील उमेदवार घोषित केले असून राहुल गांधी, शशी थरूर, भूपेश बघेल यांसारख्या बड्या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे.

नुकतीच सीईसीच्या बैठकीत उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली होती. या बैठकीनंतर काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले होते. सर्व जागांवर चर्चा झाली असून तिकीट वाटपाबाबतही चर्चा झाली आहे. प्रत्येक बाबतीत लोकांकडून मत मागवल्यानंतर उमेदवार निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. काँग्रेस सीईसीची पुढील बैठक 11 मार्च रोजी होणार आहे.

सीईसी बैठकीत उमेदवारांवर चर्चा

काँग्रेस अध्यक्ष मल्लकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सीईसी बैठकीत 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या लोकसभेच्या जागांवर चर्चा झाली. यामध्ये दिल्ली, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, तेलंगणा, सिक्कीम, त्रिपुरा, नागालँड, मणिपूर, मेघालय आणि लक्षद्वीप या लोकसभा जागांचा समावेश आहे. त्यापैकी 39 जागांसाठी आता उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. उर्वरित जागांसाठीच्या उमेदवारांच्या नावाबाबत सध्या मंथन सुरू असून, येत्या काही दिवसांत पक्षाकडून लवकरच दुसरी यादी जाहीर होईल, असे मानले जात आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा पुढील आठवड्यात जाहीर होऊ शकतात. मात्र त्याआधीच राजकीय पक्षांकडून उमेदवार निश्चितीसाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. सर्वच पक्ष उमेदवारांची यादी तयार करण्यात व्यस्त आहेत. भाजपने 195 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. याशिवाय अनेक प्रादेशिक पक्षांनीही याद्या जाहीर केल्या आहेत. याचदरम्यान, शुक्रवारी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

उत्तर प्रदेशमधील उमेदवारांची प्रतीक्षा

काँग्रेसने पहिल्या यादीत उत्तर प्रदेशातील जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत. पक्ष ‘इंडिया’ आघाडी अंतर्गत राज्यात निवडणूक लढवत असून समाजवादी पक्षाने काँग्रेसला 17 जागा दिल्या आहेत. या जागा अमेठी, रायबरेली, प्रयागराज, वाराणसी, महाराजगंज, देवरिया, बांसगाव, सीतापूर, अमरोहा, बुलंदशहर, गाझियाबाद, कानपूर, झाशी, बाराबंकी, फतेहपूर सिक्री, सहारनपूर आणि मथुरा आहेत. मात्र, यापैकी एकाही उमेदवाराची घोषणा पक्षाने केलेली नाही.

Advertisement
Tags :

.