पंतप्रधानांच्या मातोश्रींच्या अवमानाबद्दल राहूल गांधींनी त्वरित माफी मागावी
भाजपची मागणी, काँग्रेस कार्यालयावर मोर्चा
पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या स्व. मातोश्रींबाबत अवमानकारक वक्तव्ये केल्याप्रकरणी गोवा प्रदेश भाजपतर्फे पणजीत मोर्चा काढून काँग्रेस नेत्यांचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी भाजपचे आमदार, पदाधिकारी तसेच प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेस नेते राहुल गांधी पंतप्रधानांना विरोध करत असतानाच त्यांना अवमानकारक शब्द वापरत आहेत. आता ते त्यांच्या स्वर्गीय मातोश्रींना अवमानकारक शब्द वापरु लागले आहेत, याबद्दल त्यांनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली. काल सोमवारी सायंकाळी पणजीतील भाजप कार्यालयासमोर सर्वजण जमले आणि त्यांनी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे नेते यांचा निषेध केला.
आमदार दाजी साळकर, केदार नाईक, प्रेमेंद्र शेट, तसेच डॉ. चंद्रकांत शेट्यो व नरेंद्र सावईकर आणि इतर असंख्य भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. भाजप कार्यालयाकडून हा मोर्चा सुरू झाला आणि काही प्रमुख रस्त्यांवरून फिरला तसेच काँग्रेस कार्यालयाजवळ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नंतर पुन्हा मोर्चा भाजप कार्यालयाजवळ येऊन सांगता करण्यात आली. भाजप आमदारांनी कार्यालयाजवळ झालेल्या सभेत थोडक्यात भाषणे करून काँग्रेस पक्षाचा निषेध नोंदवला. मोदींविरोधात अवमानकारक वक्तव्ये यापुढे खपवून घेतली जाणार नाहीत असा इशाराही मोर्चातून देण्यात आला. गोवा भाजप प्रदेश अध्यक्ष दामू नाईक यांनी मोर्चासाठी आवाहन केले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला.