For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राहुल गांधींची पोलिसांकडून सुटका

06:58 AM Jul 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
राहुल गांधींची पोलिसांकडून सुटका
Advertisement

पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

‘नीट-युजी’ परीक्षा प्रश्नपत्रिकाफुटीप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत निवासस्थानासमोर निदर्शने करणाऱ्या राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. जवळपास अडीच तासांनी पोलिसांनी त्यांची सुटका केली आहे. राहुल गांधी यांची निदर्शनाच्या स्थानावरुन अक्षरश: उचलबांगडी करून त्यांना पोलिसांच्या गाडीत बसविण्यात आले होते. तसेच त्यांच्यासमवेत समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनाही अशाच प्रकारे ताब्यात घेण्यात आले होते. प्रियांका गांधी यांनाही पोलिसांच्या गाडीत बसवून तेथून नेण्यात आले होते.

Advertisement

कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने सोमवारी संसदेवर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्या मोर्चात पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली होती आणि पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमारही केला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत निवासस्थानावर मंगळवारी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने मोर्चा आणि निदर्शनांचे आयोजन केले होते. दुपारी चार वाजण्याच्या आसपास राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काही अंतरावर पोलिसांनी मोर्चा आडवला. तसेच मोर्चेकऱ्यांना मागे परतण्याची सूचना करण्यात आली.

रस्त्यावरच ठिय्या

राहुल गांधी, प्रियांका गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश, या पक्षाचे संसदेतले अनेक खासदार आणि पक्षाचे इतर महत्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा समावेश असलेला हा मोर्चा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानजीक तो आडविण्यात आल्यानंतर राहुल गांधी आणि इतरांनी रस्त्यावरच ठिय्या दिला. केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिसांच्या वरीष्ठ अधिकाऱ्याने राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना धरणे आंदोलन आवरते घेण्याची विनंती करण्यात आली.

चर्चेसाठी केंद्रीय मंत्री

पोलिसांची सूचना धुडकावून राहुल गांधी आणि इतरांनी ठिय्या आंदोलन सुरुच ठेवले. साधारणत: 1 तासानंतर केंद्रीय राज्यमंत्री जीतेंद्रसिंग राहुल गांधी यांच्यापाशी आले आणि त्यांनी गांधी यांच्याशी चर्चा केली. ही चर्चा साधारणत: 15 मिनिटे चालली. राहुल गांधी यांच्या मागण्यांवर विचार करण्यास सरकार सज्ज आहे. त्यांनी आता आंदोलन आवरते घ्यावे आणि हे स्थान सोडावे, असे जीतेंद्रसिंग यांनी राहुल गांधी यांच्या कानावर घातले. राहुल गांधी यांनी ठिय्या मागे घेत असल्याचे आपल्याकडे स्पष्ट केले, असेही जीतेंद्रसिंग यांनी नंतर पत्रकारांसमोर स्पष्ट केले.

राहुल गांधी यांनी मोडला शब्द ?

ही चर्चा झाल्यानंतरही राहुल गांधी आणि इतरांनी ठिय्या सुरुच ठेवला. या स्थानावरुन मागण्या मान्य झाल्याखेरीच उठू नका, असा आदेश राहुल गांधी यांनी त्यांच्यासह आलेल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिला. राहुल गांधी यांनी ठिय्या मागे घेण्याचा शब्द दिलेला होता. तथापि, त्यांनी तो मोडला आणि धरणे चालूच ठेवले, असा आरोप जीतेंद्रसिंग यांनी केला. त्यानंतर मात्र, पोलिसांनी धरणेकऱ्यांची धरपकड केली. साधारणत: 20 मिनिटांमध्ये हा परिसर रिकामा करण्यात आला.

उचलून बसवले गाडीत

राहुल गांधी यांना पोलिसांनी अक्षरश: उचलून गाडीत बसवले. पोलिस जवळ आल्यानंतरही गांधी उठण्यास तयार नव्हते. तथापि दोन पोलिसांनी जमीनीवर पडून निषेध करणाऱ्या गांधी यांना उचलले आणि गाडीत घालून त्यांना तेथून दूर नेण्यात आले. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव हे देखील तो वेळपर्यंत ठिय्यास्थानावर आलेले होते. राहुल गांधी यांना पाठिंबा देण्यासाठी आपण धरण्यामध्ये सहभागी झालेलो आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनीही तेथून दूर जाण्यास नकार दिल्याने त्यांचीही गांधी यांच्यासारखीच उचलबांगडी करण्यात आल्याचे दिसले.

काँग्रेसचेही स्वतंत्र आंदोलन

ड जंतरमंतरवर दीपके यांचे आंदोलन होत असताना गांधी यांचा स्वतंत्र मोर्चा

ड केंद्रीय मंत्री जीतेंद्रसिंग यांची राहुल गांधी यांच्याशी मागण्यांच्या विषयी चर्चा

ड आंदोलन मागे घेण्यास प्रथम गांधी तयार, पण नंतर आंदोलन ठेवले सुरुच

ड गांधी यांना उचलून गाडीत बसवून आणले मॉडेल टाऊन पोलीस स्थानकात

Advertisement
Tags :

.