For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगावातील ‘एसआयआर’वर राहुल गांधींनी उठवला आवाज

07:00 AM Oct 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
बेळगावातील ‘एसआयआर’वर राहुल गांधींनी उठवला आवाज
Advertisement

फॉर्म-7 द्वारे 15,000 मतदारांची नावे वगळल्याचा आरोप : ज्ञानेश कुमार यांच्यासह भाजपवर हल्लाबोल

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

कर्नाटकातील बेळगाव येथील मतदार यादीवरून वाद अधिकच तीव्र झाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी फॉर्म-7 द्वारे अंदाजे 15,000 मतदारांची नावे वगळण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये 22, 23 आणि 24 सप्टेंबर रोजी मोठ्या संख्येने फॉर्म-7 चे अर्ज प्राप्त झाल्यावरून मतदारयादीतून नावे वगळण्याची तयारी सुरू असल्याचे सूचित होते, असे म्हटले आहे. या सर्व प्रकाराचा संबंध मतचोरीशी जोडून राहुल गांधी यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Advertisement

बेळगावमध्ये मतदारयादीतून अंदाजे 15,000 मतदारांची नावे वगळण्यासाठी केवळ तीन दिवसांत मोठ्या संख्येने फॉर्म-7 चे अर्ज प्राप्त झाल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. हे अर्ज 22, 23 आणि 24 सप्टेंबर रोजी सादर करण्यात आले होते. हे अर्ज मुस्लीम, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय मतदारांना लक्ष्य करणारे असल्याचा दावाही करण्यात आला आहे. या समुदायांमधील मोठ्या संख्येने लोक भाजपच्या विरोधात मतदान करत असल्यामुळेच त्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

मतदारयादीतून नावे वगळण्याचे काम सॉफ्टवेअरद्वारे केंद्रीय स्तरावर केले जाऊ शकते. भाजप आणि निवडणूक आयोगाशी संबंधित लोक निवडक व्यक्तींविरुद्ध मोठ्या प्रमाणात फॉर्म-7 भरण्यासाठी संगनमत करत असल्यामुळे मतदारयादीतून मोठ्या संख्येने नावे वगळली जाऊ शकतात, असे ते म्हणाले. कर्नाटक काँग्रेसचे नेते या कथित प्रकरणात दोषींविरुद्ध एफआयआरची मागणी करत असताना  एफआयआरबाबत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भूमिका काय आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. याचवेळी त्यांनी एसआयआर संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरही गंभीर आरोप केले.

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी

आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देऊन सरकारी साक्षीदार किंवा माफीचा साक्षीदार बनावे आणि पंतप्रधान मोदी व अमित शाह यांच्याविरोधात चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणाले. त्यांनी एसआयआरवर लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोपही केला. आपल्या रिट्विटमध्ये राहुल गांधी यांनी बेळगावमधील मुस्लीम मतदारांची माहिती आधीच भरलेल्या फॉर्म-7 अर्जांमध्ये आढळली होती आणि त्या मतदारांची नावे वगळून फॉर्मवर सह्या करण्यासाठी बूथ-स्तरीय अधिकाऱ्यांवर दबाव आणला गेला होता, असेही म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.