For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राहूल गांधीकडून युवकांची दिशाभूल

06:23 AM Jul 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
राहूल गांधीकडून युवकांची दिशाभूल
Advertisement

गोवा प्रदेश भाजपाध्यक्ष दामू नाईक यांचा आरोप: नेते, कार्यकर्त्यांचा काँग्रेस कार्यालयावर मोर्चा

Advertisement

त.भा. प्रतिनिधी

पणजी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना देशातील विद्यार्थ्यांशी काहीच घेणे देणे नाही. ते केवळ स्वत:चा राजकीय फायदा पाहात असून त्याच हेतूने त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर आंदोलन केले होते. त्यांचा हा प्रयत्न म्हणजे युवकांची दिशाभूल करण्याचा प्रकार होता, असे आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केले.

Advertisement

बुधवारी भाजपतर्फे पणजीत काँग्रेस कार्यालयावर निषेध मोर्चा नेण्यात आला त्यावेळी नाईक बोलत होते. या मोर्चात मंत्री रोहन खंवटे, आमदार नीलेश काब्राल, दाजी साळकर, केदार नाईक, राजेश फळदेसाई, यांच्यासह अन्य नेते, पदाधिकारी, आणि शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

पुढे बोलताना नाईक यांनी, देशातील सर्वोच्च पदावरील व्यक्तीच्या घरासमोर गुंडगिरी करण्याचा राहुल गांधी यांनी केलेला प्रयत्न अत्यंत चुकीचा होता, त्याचा आम्ही निषेध करतो, असे सांगितले.

नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण खात्याने सीबीआयकडे तक्रार नोंदवली आहे. सध्या या प्रकरणी चौकशी सुरू आहे. लवकरच एसआयटी देखील स्थापन करण्यात येणार आहे. मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी घेऊन विद्यार्थ्यांची माफीही मागितली आहे, असे असतानाही त्याच विषयावरून आंदोलन करणे चुकीचे आहे, असे नाईक म्हणाले.

युवाशक्ती हा भाजप सरकारचा एक मोठा आधारस्तंभ आहे. म्हणुनच गत बारा वर्षांच्या कालावधीत मोदी सरकारने युवकांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. ‘खेलो इंडिया’, ‘स्टार्ट अप इंडिया’ सारख्या योजनांचा अनेक युवकांना लाभ झाला आहे.

दरम्यान, मंगळवारी दिल्लीत राहूल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर गोव्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी दोनापावला येथे निदर्शने केली होती. त्यानंतर काल बुधवारी भाजपने राजधानीत काँग्रेस मुख्यालयावर मोर्चा नेऊन जोरदार घोषणाबाजी केली. हा मोर्चा म्हणजे काँग्रेसच्या निदर्शनाना एकप्रकारे प्रत्युत्तरच ठरला.

Advertisement
Tags :

.