For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राहुल गांधींनी घेतली हाथरस पीडितांची भेट

06:24 AM Jul 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
राहुल गांधींनी घेतली हाथरस पीडितांची भेट
Advertisement

मृतांच्या वारसांना अधिकाधिक भरपाई देण्याची मागणी

Advertisement

वृत्तसंस्था/ हाथरस, लखनौ

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी हाथरस चेंगराचेंगरी दुर्घटनेतील पीडितांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासोबतच त्यांची परिस्थिती आणि समस्या जाणून घेण्याचा प्रयत्नही त्यांनी केला.

Advertisement

हाथरसला जाण्यासाठी राहुल गांधी शुक्रवारी पहाटे रवाना झाले होते. याचदरम्यान वाटेत अलिगडच्या पिलखाना गावात पोहोचल्यानंतर त्यांनी हाथरस चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर थेट हाथरसला जात पीडित कुटुंबांच्या व्यथा जाणून घेतल्या.

हाथरसमध्ये राहुल गांधींचा वेगळा अवतार पाहायला मिळाला. पीडितांशी थेट संवाद साधताना राहुल गांधींच्या डोळ्यांमध्येही अश्रू निघाले. राहुल गांधींच्या खांद्यावर माथा टेकवत पीडितांनी आपले दु:ख हलके केले. यादरम्यान एका पीडितेने आपल्या मुलीचे कसे निधन झाले हे सविस्तरपणे सांगितले. पीडितांनी प्रशासनाला जबाबदार ठरवत राहुल यांच्यासमोर आपली कैफियत मांडली. त्यावर राहुल गांधी यांनी त्यांना मदतीचे आश्वासन दिले. तसेच हा मुद्दा संसदेत मांडणार असल्याचे सांगितले.

हाथरसमध्ये राहुल केवळ संवेदनशीलच नव्हे तर गंभीर नेता म्हणूनही दिसले. पत्रकारांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी पीडितांना राज्य आणि केंद्र सरकारने अधिकाधिक रक्कम नुकसान भरपाई म्हणून द्यावी असे स्पष्ट केले. पीडित कुटुंबीय अतिशय गरीब आणि दुर्बल असल्यामुळे सरकारने त्यांना मोठी आर्थिक मदत तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली.

‘मला या प्रकरणाचे राजकारण करायचे नाही. व्यवस्थेत उणिवा आहेत...मला वाटतं या लोकांना जास्त नुकसान भरपाई मिळायला हवी कारण ही कुटुंबं खूप गरीब आहेत. ...पोलिसांचा बंदोबस्त पुरेसा नव्हता असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे...’ असे राहुल गांधी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

2 जुलै रोजी उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत 123 लोक मरण पावले होते. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 6 आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी बाबाचा मुख्य सेवक देवप्रकाश मधुकर याला मुख्य आरोपी बनवले असून तो अद्याप फरार आहे. पोलिसांनी त्याच्यावर एक लाख ऊपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. दुर्घटनेनंतर बाबाही भूमिगत झाले आहेत. मात्र, तपासादरम्यान गरज पडल्यास बाबाची चौकशी केली जाईल, असे उत्तर प्रदेश पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

Advertisement
Tags :

.