शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राहुल गांधी सरकारवर बरसले
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला लक्ष्य केले. केंद्र शेतकऱ्यांच्या दुर्दशेबद्दल उदासीन आहे. शेतकरी दरदिनी कर्जात बुडत चालले आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि पिकांसाठी हमीभावाच्या कायदेशीर हमीच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी एक्सवर एक पोस्ट करत केला आहे. महाराष्ट्रात तीन महिन्यांमध्ये 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, तरीही सरकार या मुद्द्यावर गप्प आहे.
बियाणं महागली असून खत अन् डिझेलही महागले आहे. तरीही एमएसपीची कुठलीच हमी नाही. शेतकरी जेव्हा कर्जमाफीची मागणी करतात, तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. तर ज्यांच्याकडे कोट्यावधी रुपये आहेत, त्यांचे कर्ज मोदी सरकार सहजपणे माफ करते असा दावा त्यांनी केला आहे. पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असे आश्वासन दिले होते. परंतु सद्यस्थितीत अन्नदात्याचे आयुष्य निम्मे होत आहे. ही सिस्टीम शेतकऱ्यांचा जीव घेत असताना मोदी हे गप्प बसले असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे.