‘गोवा राखण यात्रे’त राहुल गांधी, खरगे, प्रियांका गांधींसह काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार
पणजी : गोव्याच्या विविध प्रश्नांवर जनजागृती करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘गोवा राखण यात्रेत’ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सरचिटणीस प्रियांका गांधी तसेच काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार असल्याची माहिती गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली.
ही यात्रा 2 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात आयोजित करण्यात येणार असून, याच दिवशी काँग्रेसकडून महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात येणार आहे. गांधी जयंतीच्या निमित्ताने जनतेशी संवाद साधत गोव्याच्या हिताशी संबंधित विविध मुद्दे मांडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे चोडणकर यांनी सांगितले.
‘गोवा राखण यात्रा’च्या माध्यमातून गोव्याच्या अस्मितेचे रक्षण, जनतेचे प्रश्न आणि राज्याच्या भवितव्याशी संबंधित विषयांवर आवाज उठविण्यात येणार आहे. यात्रेला राष्ट्रीय नेत्यांची उपस्थिती लाभणार असल्याने या उपक्रमाला व्यापक स्वरूप मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री गोव्यात येणार असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 2 ऑक्टोबरच्या कार्यक्रमाकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.