राहुल गांधी ‘स्वयंघोषित’ महानेता
भारतीय जनता पक्षाचा घणाघात, टीकेचा समाचार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यासमोर शरणागती पत्करली आहे, या राहुल गांधी यांच्या आरोपाला भारतीय जनता पक्षाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. असे विधान करुन गांधी यांनी भारताच्या सेनादलांचा अपमान केला आहे, अटी टीका या पक्षाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केली आहे. राहुल गांधी यांच्यात समंजसपणा आणि गांभीर्य यांचा अभाव आहे. ते स्वयंघोषित महानेता असल्यासारखे वागत असून त्यामुळे स्वत:च हास्यास्पद ठरत आहेत. त्यांनी केलेल्या अनेक टिप्पणी अत्यंत दर्जाहीन असून त्यांना कोणत्याही प्रसंगाचे महत्वच कळत नाही, हे स्पष्ट होते. भारताचा पराक्रम आज जगासमोर असताना, आणि जगात त्याची वाखाणणी होत असताना, राहुल गांधी यांना ती ‘शरणागती’ वाटते, यातूनच त्यांची मनोवृत्ती स्पष्ट होते, असा टोला त्यांनी दिला.
देशाच्या आत्मसन्मानावर आघात
‘सिंदूर’ अभियानाच्या अंतर्गत भारताने पाकिस्तानची किती मोठी हानी केली आहे, हे साऱ्या जगासमोर स्पष्ट झाले आहे. पाकिस्ताने स्वत:च याची कबुलीही दिली आहे. तथापि, राहुल गांधी ‘नया मुल्ला ज्यादा प्याज खाता है’ या म्हणीप्रमाणे वागत आहेत. त्यांच्या बेजबाबदार विधानांमुळे देशाच्या आत्मसन्मालाच ठेच लागत आहे, हे समजून घेण्याइतके भान त्यांना नाही, असा घणाघात त्यांनी केला.
विधान काय होते...
अमेरिकेच्या दबावामुळे भारताने पाकिस्तानशी शस्त्रसंधी केली, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. काँग्रेसने असे कधीही केले नसते, अशी टिप्पणीही त्यांनी केली होती. तथापि, 2008 मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईवर केलेल्या हल्ल्यानंतर त्यावेळच्या काँग्रेसप्रणित सरकारने पाकिस्तानविरोधात कोणतीही कारवाई केली नव्हती, यासंबंधी त्यांनी कोणतेही विधान केले नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रंप यांच्यासमोर शरणागती पत्करुन शस्त्रसंधी केल्याचा आरोप त्यांनी केला होते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने हा पलटवार केला आहे.
पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांच्याही वरताण
‘सिंदूर’ अभियानाच्या संदर्भात आजवर काँग्रेस नेते किंवा राहुल गांधी जे बोलत होते, त्याला पाकिस्तानच्या प्रसार माध्यमांमधून मोठी प्रसिद्धी मिळत होती. त्यांची विधाने पाकिस्तानी वृत्तपत्रांना मथळे पुरवित होती. पाकिस्तानच्या संसदेत काँग्रेस नेत्यांच्या विधानांचे कौतुक होत होते. पण राहुल गांधी यांनी याच्याही पुढची मजल मारली आहे. पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनीही जे विधान केलेले नाही, किंवा पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांनीही जी विधाने केलेली नाहीत, ते राहुल गांधी करीत आहेत, अशी चौफेर टीका त्रिवेदी यांनी केली.
पाकिस्तानला ‘फायर कव्हर’
राहुल गांधी पाकिस्तानला जणू ‘फायर कव्हर’ पुरवित आहेत. डोकलाम ते पहालगाम अशा प्रत्येक संघर्षात राहुल गांधी यांनी भारताच्या पराक्रमावर संशय व्यक्त केला आहे. या सर्व संघर्षांच्या काळात सारा भारत एकजूट झाला आहे. तथापि, राहुल गांधी त्यांच्या परंपरेला जागून देशाच्या शत्रूच्या बाजूने उभे राहताना दिसतात. ज्या वेळी साऱ्या देशाने आपल्या एकात्मतेची वज्रमूठ जगाला दाखविली पाहिजे, त्या स्थितीत गांधी देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. ही त्यांची वृत्ती आणि कृती भारतीय जनतेच्या समोर असून जनता योग्य वेळी त्यांच्याकडे याचे उत्तर मागितल्याशिवाय रहाणार नाही. राहुल गांधी यांनी स्वत:चे आणि स्वत:च्या पक्षाचे अंतरंग या निमित्ताने प्रकट केले आहे, याची नोंद जनता घेतल्या शिवाय रहाणार नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या माहिती तंत्रज्ञान कक्षाचे प्रमुख अमित मालवीय यांनीही बुधवारी एक्सवर केली आहे.