For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राहुल गांधींचा बालाघाटमध्ये आदिवासी जनतेशी संवाद

07:00 AM Oct 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
राहुल गांधींचा बालाघाटमध्ये आदिवासी जनतेशी संवाद
Advertisement

30 मुलांच्या मृत्यूबाबत आवाज उठविण्याचा प्रयत्न

Advertisement

वृत्तसंस्था/बालाघाट

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी मध्य प्रदेशातील बालाघाट येथील जगला गावात बैगा आदिवासींची भेट घेतली. आजारपणामुळे मृत्यू पावलेल्या 30 मुलांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी ते आले होते. आदिवासी मुलांच्या मृत्यूमुळे प्रभावित झालेल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी हा दौरा आहे. याप्रसंगी त्यांनी मृत मुलांच्या कुटुंबीयांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच माध्यमांशी संवाद साधत आपण या मुद्दावर संसदेमध्ये आवाज उठवणार असल्याचेही स्पष्ट केले. गेल्या 13 दिवसांतील राहुल गांधींचा हा मध्य प्रदेशचा दुसरा दौरा आहे.

Advertisement

यापूर्वी, 19 सप्टेंबर रोजी त्यांनी इंदूरमधील ‘छात्राओं की गुंज’ कार्यक्रमात भाग घेतला होता. याचदरम्यान गेल्या काही दिवसात मध्यप्रदेशातील बालाघाटच्या आदिवासीबहुल भागात बैगा आदिवासी मुलांचे मृत्यू अव्याहतपणे सुरूच राहिल्याने पुन्हा ते राज्यात पोहोचले. आदिवासी मुलांच्या मृत्यूप्रकरणी मंत्री आणि मुख्यमंत्रीही बालाघाटला पोहोचले असूनही आरोग्य विभागाला परिस्थिती नियंत्रणात आणता आलेली नाही. प्रशासन आणि आरोग्य विभाग सर्वसामान्यांना औषधे आणि लसींचे वाटप करण्यासाठी गावोगावी पोहोचत असले तरी, परिस्थिती अजूनही गंभीरच आहे. या सततच्या मृत्यूंमुळे आदिवासी भागातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मध्यप्रदेश सरकारवर निशाणा

माध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधींनी मध्यप्रदेश सरकारवर निशाणा साधला. अनेक मुलांचा मृत्यू झाला आहे, पण सरकारने कोणतीही सुविधा दिलेली नाही. येथे आरोग्य किंवा शिक्षण नाही. भारताच्या मध्यभागी आदिवासींना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. त्यांच्या जमिनीचा, भाडेपट्ट्याचा प्रश्न आहे, मुलांचा मृत्यू झाला आहे पण त्यांना नुकसान भरपाईसुद्धा मिळालेली नाही. सरकारने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे, असे राहुल गांधी म्हणाले. सरकारने आदिवासींना शाळा आणि रुग्णालये उपलब्ध करून दिली पाहिजेत. त्यांना एका योजनेअंतर्गत पैसे मिळत असताना, दुसऱ्या योजनेचा लाभ मिळत नाही. आमचे सरकार सत्तेवर येताच आम्ही मदत करू आणि वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करू. मी हा मुद्दा लोकसभेत मांडेन, मी संपूर्ण देशातील आदिवासींचा आवाज बुलंद करेन, असेही राहुल गांधी पुढे म्हणाले.

Advertisement
Tags :

.