दिल्लीत मजुरांशी राहुल गांधींनी साधला संवाद
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी दिल्लीतील जीटीबी नगरमध्ये काम करत असलेल्या मजुरांशी संवाद साधला आहे. काँग्रेसने एक्स हँडलवरून अनेक छायाचित्रे शेअर केली असून यात राहुल गांधी हे या मजुरांसोबत काम करताना दिसून येतात. राहुल गांधींनी मजुरवर्गाची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. हे मेहनती मजूर भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. त्यांच्या जीवनाला सुलभ आणि भविष्याला सुरक्षित करणे आमची जबाबदारी असल्याचे काँग्रेसने ही छायाचित्रे शेअर करत म्हटले आहे.
काँग्रेसने स्वत:च्या घोषणापत्रात कामगारांच्या कल्याणासाठी औद्योगिक आणि कामगार कायद्यांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते. तसेच काँग्रेसने मनरेगा मजुरी वाढवून 400 रुपये प्रतिदिन करण्याचे आश्वासन दिले होते. राहुल गांधी यांनी यापूर्वी विविध वर्गाच्या कामगारांची भेट घेतली होती. काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या आनंदविहार रेल्वेस्थानकावरील कुलींची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होता. तर कधी ट्रकचालकासोबत प्रवास करून त्यांच्या समस्या जाणल्या होत्या. मोटर मॅकेनिकसोबत काम करताना देखील ते दिसून आले आहेत.