प्रियांकांच्या प्रचारासाठी राहुल गांधी वायनाडमध्ये
वृत्तसंस्था/ वायनाड
केरळमधील वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीदरम्यान बहीण प्रियांका गांधी यांचा प्रचार करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी रविवारी केरळमध्ये दाखल झाले. दुपारी 4 वाजता त्यांची अरिकोडे येथे जाहीर सभा झाली. या सभेमध्ये राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागले. वायनाडमधील ही लढाई आत्मविश्वास आणि असुरक्षितता यांच्यातील असल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे प्रियांका गांधी यांनीही प्रचारसभांचा धडाका लावत वलद, कोरोम, थिरियोडे कलपेट्टा येथे सभा घेतल्या.
प्रियांका गांधी युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटच्या (युडीएफ) उमेदवार म्हणून वायनाडमधून निवडणूक लढवत आहेत. राहुल गांधींनी हा मतदारसंघ सोडल्यामुळे येथे पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. येथे 13 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. 11 नोव्हेंबरला प्रचार संपणार असल्याने जाहीर प्रचारासाठी आता केवळ एका आठवड्याचा अवधी मिळणार आहे. वायनाडमध्ये प्रियांका गांधी भाजपच्या उमेदवार नाव्या हरिदास आणि डाव्या पक्षाचे उमेदवार सत्यान मोकेरी यांच्याविरोधात लढत आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी वायनाड आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यांनी रायबरेली ही गांधी घराण्याची परंपरागत जागा स्वीकारली होती.