राहुल गांधी यांना जामीन मंजूर
मानहानी प्रकरणी चाईबासा न्यायालयात सुनावणी
वृत्तसंस्था/ चाईबासा
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना मानहानीच्या एका प्रकरणात बुधवारी जामीन मिळाला आहे. झारखंडच्या चाईबासा एमपी-एमएलए न्यायालयाने दिलासा दिला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासंबंधी राहुल गांधी यांनी एक वादग्रस्त टिप्पणी केली होती. याप्रकरणी भाजप नेते प्रताप कटिहार यांनी मानहानीचा खटला भरला होता. हा पूर्ण वाद 2018 मधील असून राहुल यांनी काँग्रेस अधिवेशनादरम्यान हे वादग्रस्त वक्तव्य केले होते.
राहुल गांधी बुधवारी सकाळी 10.55 च्या सुमारास न्यायालयात उपस्थित राहिले. राहुल गांधी हे झारखंड उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुनावणीस हजर राहिले. राहुल यांनी केलेला जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला असून आम्ही आता ही प्रक्रिया पुढे नेणार आहोत असे त्यांच्या वकिलाने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
राहुल यांनी 28 मार्च 2018 रोजी काँग्रेस अधिवेशनादरम्यान भाजपचे तत्कालीन अध्यक्ष अमित शाह यांच्यासंबंधी वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर 9 जुलै 2018 रोजी प्रताप कटिहार यांनी चाईबासा न्यायालयात मानहानीची याचिका दाखल केली होती. राहुल यांना याप्रकरणी अनेकदा समन्स बजावण्यात आला होता, परंतु ते सुनावणीस अनुपस्थित राहिले होते. परंतु बुधवारी त्यांना सुनावणीस उपस्थित रहावे लागले आहे.
यापूर्वी हे प्रकरण चाईबासा सीजेएम न्यायालयातून रांची एमप-एमएलए विशेष न्यायालयात वर्ग करण्यात आले होते, परंतु यानंतर चाईबासा एमपी-एमएलए न्यायालयात हे स्थानांतरित करण्यात आले.
याप्रकरणी एप्रिल 2022 मध्ये न्यायालयाने जामिनपात्र वॉरंट, मग फेब्रुवारी 2024 मध्ये अजामिनपात्र वॉरंट जारी केले होते. राहुल गांधी यांनी सुनावणीस अनुपस्थित राहण्याची सूट मिळावी म्हणून सीआरपीसीचे कलम 205 अंतर्गत अर्ज केला होता, जो न्यायालयाने फेटाळला होता. याच्या विरोधात त्यांनी झारखंड उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि त्यांना काही काळापर्यंत दिलासा मिळाला होता, परंतु मार्च 2024 मध्ये उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली होती.
यानंतर चाईबासा न्यायालयाने 22 मे 2025 रोजी पुन्हा अजामिनपात्र वॉरंट जारी केले होते. अखेर राहुल गांधी हे बुधवारी न्यायालयासमोर हजर राहिले. न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. राहुल गांधी यांच्या वतीने वरिष्ठ अधिवक्ते प्रदीप चंद्रा आणि दीपांकर रॉय यांनी बाजू मांडली आहे.