सैन्यावर टिप्पणी, राहुल गांधींना जामीन
लखनौतील विशेष न्यायालयासमोर राहिले उपस्थित
वृत्तसंस्था/ लखनौ
काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मंगळवारी लखनौ येथील एमपी-एमएलए न्यायालयासमोर उपस्थित राहिले. भारतीय सैन्याबद्दल केलेल्या कथित मानहानीकारक टिप्पणीसंबंधी दाखल याचिकेप्रकरणी राहुल गांधी यांना न्यायालयासमोर हजर व्हावे लागले. यानंतर राहुल गांधी यांच्या वकिलाने जामीन याचिका दाखल केली, जी न्यायालयाने मंजूर करत राहुल गांधींना जामीन दिला आहे. यापूर्वी न्यायालयाने राहुल गांधींना समन्स जारी केला होता.
16 डिसेंबर 2022 रोजी भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी चिनी सैन्यासोबतच्या झटापटीचा उल्लेख करत कथित स्वरुपात अपमानास्पद टिप्पणी केली होती. चिनी सैनिक आमच्या सैनिकांना मारत आहेत, परंतु प्रसारमाध्यमे याबद्दल प्रश्नही विचारत नसल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले होते. ही टिप्पणी सैन्याचा अपमान करणारी असल्याचा आरोप झाला होता.
सैन्याचे अधिकृत स्पष्टीकरण
चिनी सैन्याने भारतीय सीमेत घुसखोरीचा प्रयत्न केला होता, ज्याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले, यामुळे चिनी सैनिकांना माघारी परतावे लागल्याचे वक्तव्य भारतीय सैन्याने जारी करत राहुल गांधींच्या टिप्पणीवर भूमिका स्पष्ट केली होती.
निवृत्त अधिकाऱ्याकडून याचिका
सैन्यासंबंधी राहुल गांधी यांनी केलेल्या टिप्पणीवरून बीआरओचे निवृत्त संचालक उदय शंकर श्रीवास्तव यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. राहुल गांधींनी जाणूनबुजून भारतीय सैन्याची प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने खोटे अन् मानहानिकारक वक्तव्य केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता.
