For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राहुल गांधी रायबरेलीतून रिंगणात अमेठीमधून किशोरीलाल शर्मा

06:58 AM May 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
राहुल गांधी रायबरेलीतून रिंगणात अमेठीमधून किशोरीलाल शर्मा
Advertisement

काँग्रेसकडून शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल : सोनिया-प्रियांका यांचीही उपस्थिती

Advertisement

वृत्तसंस्था/ रायबरेली, अमेठी

गेल्या काही दिवसांच्या प्रतिक्षेनंतर काँग्रेसने अखेर शुक्रवारी सकाळी अमेठी आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली. काँग्रेसच्या निवडणूक समितीने घेतलेल्या निर्णयानुसार पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उमेदवारांची घोषणा केल्यानुसार राहुल गांधी हे रायबरेलीमधून लढणार असून त्यांचा सामना भाजपच्या दिनेश प्रताप सिंह यांच्याशी होईल. तर अमेठीमधून किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांना भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांच्याशी लढत द्यावी लागेल.

Advertisement

अमेठी आणि रायबरेलीच्या जागा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होत्या. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी अमेठी आणि रायबरेलीतील उमेदवारांची घोषणा पक्षाकडून करण्यात आली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, बहीण प्रियांका गांधी-वधेरा आणि त्यांचे पती रॉबर्ट वधेरा हेदेखील उपस्थित होते.

रायबरेलीमधून जागेवरून भाजपचे दिनेश प्रताप सिंह यांच्याविरोधात राहुल गांधी निवडणूक लढवत आहेत. सोनिया गांधी या रायबरेलीच्या खासदार आहेत. त्या राज्यसभेवर गेल्याने आता राहुल गांधी रायबरेलीतून राजकीय आखाड्यात उतरले आहेत. 2019 च्या निवडणुकीत रायबरेलीमधून काँग्रेसने विजय मिळवला होता. मात्र राहुल यांना अमेठीतून भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. राहुल गांधी यांनी यापूर्वी केरळमधील वायनाड येथून उमेदवारी अर्ज दाखल केला असून तेथील मतदानही पूर्ण झाले आहे.

प्रियांका यांच्या नावाची चर्चा निष्फळ

काँग्रेसची यादी समोर येताच प्रियांका गांधी यावेळी निवडणूक रिंगणात उतरणार नसल्याचे स्पष्ट झाले. या निवडणुकीत त्या अमेठी किंवा रायबरेलीमधून निवडणूक लढवतील अशी शक्मयता वर्तवली जात होती. रायबरेलीतून प्रियांका गांधींना रिंगणात उतरवले जाऊ शकते, तर राहुल पुन्हा एकदा स्मृती इराणी यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात होती. मात्र उमेदवारांची यादी समोर आल्यानंतर प्रियांका सध्या निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट झाले. प्रियांका गांधी यंदा लोकसभा निवडणूक लढवणार नसून केवळ प्रचारावर लक्ष केंद्रित करणार आहेत.

किशोरीलाल शर्मांना अमेठीतून संधी

रायबरेली आणि अमेठीच्या जागांसाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. पक्षाने शुक्रवारी दिलेल्या निवेदनानुसार, गांधी घराण्याचे जवळचे सहकारी किशोरीलाल शर्मा यांना अमेठी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. गांधी घराण्यातील सदस्याच्या अनुपस्थितीत शर्मा या प्रतिष्ठित मतदारसंघाची जबाबदारी सांभाळत आहेत. दरम्यान, अमेठीतील काँग्रेस उमेदवार किशोरीलाल शर्मा यांनी प्रियांका गांधी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रियांका गांधी अमेठीतून निवडणूक लढवू शकतात अशी अटकळ याआधी वर्तवली जात होती. मात्र यादी जाहीर झाल्यानंतर सर्व अटकळांना पूर्णविराम मिळाला. गांधी घराण्याच्या जवळचे किशोरीलाल शर्मा यांच्याकडे अमेठीचा किल्ला जिंकून काँग्रेसच्या ताब्यात देण्याची जबाबदारी आहे. गेल्या 40 वर्षांपासून ते या क्षेत्रात कार्यरत आहेत.

...आम्ही अमेठीही जिंकू : प्रियांका गांधी

किशोरीलाल शर्मा यांच्या शक्तिप्रदर्शनात सहभागी झालेल्या प्रियांका गांधी सहभागी झाल्या होत्या. याप्रसंगी ‘मी या निवडणुकीतील प्रचारात पक्षाने दिलेल्या उमेदवाराला समर्थपणे साथ देणार आहे. तुमचा विकास व्हावा यासाठी आम्ही या निवडणुका तुमच्यासाठी लढवू. आता आम्ही सेवेचे राजकारण करतो, असा संदेश देशाला देण्याची ही संधी चालून आली आहे. ही तुमची निवड आहे, तुम्ही जिंकाल. मी 6 मे पर्यंत अमेठीत राहीन. जनतेच्या बळावर आम्ही अमेठीची निवडणूक जिंकू’ असा दावा प्रियांका यांनी केला.

दोन जागांवरून राहुल गांधी लढणार

रायबरेलीसोबतच केरळमधील वायनाडमधूनही राहुल गांधी निवडणूक लढवत आहेत. एकाच निवडणुकीत राहुल दोन जागांवरून निवडणूक लढवण्याची ही दुसरी वेळ आहे. गेल्या वेळीही त्यांनी अमेठीसह वायनाडमधून निवडणूक लढवली होती. अमेठीतून त्यांचा सुमारे 50 हजार मतांनी पराभव झाला, तर वायनाडमधून बंपर मतांनी विजयी होऊन ते संसदेत पोहोचले. वायनाडमध्ये लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. राहुल येथे सहज विजय मिळवू शकतात, अशी अपेक्षा आहे. मात्र, 4 जूनला निकाल लागल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.

पराभवाच्या भीतीने रायबरेलीची निवड : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पश्चिम बंगालमधील वर्धमान येथे एका सभेला संबोधित केले. रायबरेलीतून निवडणूक लढवल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. वायनाडमधील पराभवाच्या भीतीने काँग्रेसचे युवराज स्वत:साठी दुसरी जागा शोधत आहेत. आता त्यांना अमेठीतून पळून जाऊन रायबरेलीची जागा निवडावी लागली आहे. हे लोक सर्वांना ‘घाबरू नका’ असे सांगत फिरतात. पण आता मी त्यांनाही ‘घाबरु नका आणि पळूही नका!’ हेच सांगेन असे पंतप्रधान म्हणाले.

विजयाची संधी नसल्यामुळे अमेठीतून पळ : स्मृती इराणी

अमेठी मतदारसंघातून स्मृती इराणी भाजपकडून रिंगणात आहेत. गेल्या वेळी स्मृती इराणी यांनी अमेठीतून राहुल गांधी यांचा पराभव केला होता. राहुल रायबरेलीतून निवडणूक लढवत असल्याबद्दल स्मृती इराणी म्हणाल्या, पाहुण्यांचे स्वागत आहे. पाहुण्यांचे स्वागत करण्यात आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही. गांधी कुटुंबीयांनी अमेठीतून निवडणूक न लढवल्याने काँग्रेस पक्षाने निवडणुकीत एकही मत पडण्यापूर्वीच आपला पराभव स्वीकारला आहे, असे स्मृती इराणी म्हणाल्या. ‘जर त्यांना येथे विजयाची संधी असती तर त्यांनी येथून निवडणूक लढवली असती’, अशी कोपरखळीही त्यांनी राहुल गांधी यांना उद्देशून मारली.

Advertisement
Tags :

.