राहुल गांधी यांना 200 रुपये दंड
लखनौ न्यायालयाचा निर्णय : पुढील सुनावणी 14 एप्रिलला
वृत्तसंस्था/ लखनौ
लखनौच्या एका न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना वीर सावरकरांवरील विधानाबद्दल 200 रुपयांचा दंड ठोठावला आहे. सुनावणीला सतत गैरहजर राहिल्यामुळे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी (एसीजेएम) न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. न्यायालयाने राहुल गांधींना 14 एप्रिल 2025 रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील सुनावणीला न्यायालयासमोर हजर न झाल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. वीर सावरकरांवरील विधानाप्रकरणी राहुल गांधींविरुद्ध येथील न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने राहुल गांधींना हजर राहण्याचे निर्देश दिले होते, परंतु ते न्यायालयात हजर राहिले नाहीत. सुनावणीदरम्यान राहुल गांधी यांच्यावतीने वकील प्रांशू अग्रवाल उपस्थित राहिले. त्यांनी न्यायालयात हजर राहण्यापासून सूट मिळावी यासाठी अर्ज दाखल केला. राहुल गांधी सध्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांची दिल्लीत एक महत्त्वाची बैठक होती. याशिवाय, त्यांना इतर काही कार्यक्रमांनाही उपस्थित राहावे लागल्यामुळे ते न्यायालयात हजर राहू शकले नाही. ते न्यायालयाच्या आदेशांचे आदर करतात आणि जाणूनबुजून न्यायालयात हजर राहण्याचे टाळण्याचा प्रयत्न करत नाहीत, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला.
राहुल गांधी यांनी अकोल्यात पत्रकार परिषदेत वीर सावरकरांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी सावरकरांना ‘ब्रिटिशांचे सेवक’ आणि ‘पेन्शनधारक’ म्हटले होते. राहुल गांधींच्या या विधानाविरुद्ध नृपेंद्र पांडे यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात धाव घेतली. राहुल गांधी यांच्या वक्तव्याबद्दल त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 153(अ) आणि 505 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी पांडे यांनी केली आहे.