राहुल गांधी अप्रामाणिक : केजरीवाल
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीत विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात शब्दयुद्ध शिगेला पोहचले आहे. आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी ‘सर्वाधिक अप्रामाणिक’ नेत्यांची एक सूची प्रसिद्ध केली असून या सूचीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा समावेश केला आहे. त्यामुळे काँग्रेस संतप्त झाली असून आम आदमी पक्षाला विरोधी पक्षांच्या आघाडीतून बाहेर काढण्यात यावे, अशी मागणी या पक्षाने केली आहे. दोन्ही पक्ष विरोधी पक्षांच्या आघाडीचे सदस्य असूनही दिल्लीत एकमेकांच्या विरोधात निवडणुकीत लढत आहेत.
केजरीवाल यांच्या या सूचीत दिल्लीतील काँग्रेसचे नेते संदीप दिक्षीत आणि अजय माकन यांचाही समावेश आहे. तसेच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, दिल्लीतील या पक्षाचे नेते प्रवेश वर्मा, रमेश बिधुरी आणि वीरेंद्र सचदेवा यांनाही या सूचीत स्थान देण्यात आले आहे. तथापि, राहुल गांधी यांचे नाव या सूचीत असणे हे राजकीय वर्तुळात वैशिष्ट्यापूर्ण मानले जात आहे. या समावेशावरुन आम आदमी पक्ष आणि काँग्रेस हे पक्ष एकमेकांपासून किती दूर गेले आहेत, याची झलक पहावयास मिळते अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
विरोधी आघाडी डळमळीत
आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यातील या उभ्या संघर्षामुळे विरोधी पक्षांची आघाडी डळमळीत झाल्याचे चित्र आहे. तसेच या आघाडीत काँग्रेस एकाकी पडल्याचेही दिसून येत आहे. या आघाडीतील इतर सर्व पक्षांनी दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाला पाठिंबा दिला असून काँग्रेसच्या बाजूने एकही पक्ष उभा असलेला दिसत नाही. आता केजरीवाल यांनी थेट राहुल गांधी यांनाच लक्ष्य केले असल्याने दोन्ही पक्षांमधील ही दरी अधिकच वाढल्याचे पहावयास मिळत आहे.
या निवडणुकीनंतर भवितव्य ठरणार
विरोधी पक्षांच्या आघाडीचे भवितव्य दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर ठरेल, असे अनेक राजकीय जाणकारांचे मत आहे. दिल्लीप्रमाणे पंजाबमध्येही आम आदमी पक्ष आणि काँग्रेस एकमेकांच्या विरोधातच आहेत. आम आदमी पक्षात धाडस असेल तर त्याने विरोधी पक्षांच्या आघाडीतून बाहेर पडावे, असे आव्हान काँग्रेसने दिल्याने आघाडीची स्थिरता धोक्यात आल्याचे दिसत आहे.