For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘2024 ची निवडणूक अवैध होती; ज्ञानेश कुमारांना तुरुंगात पाठवणार’; राहुल गांधींचा गंभीर आरोप

04:58 PM Nov 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘2024 ची निवडणूक अवैध होती  ज्ञानेश कुमारांना तुरुंगात पाठवणार’  राहुल गांधींचा गंभीर आरोप
Advertisement
नवी दिल्ली : मतदार याद्यांमधील कथित फेरफार आणि ईव्हीएमच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. दिल्लीतील रामलीला मैदानावर 1 नोव्हेंबर रोजी झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेत बोलताना त्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरही त्यांनी टीका करत, त्यांच्याविरोधात कठोर कायदेशीर कारवाई होण्याची मागणी केली.

या सभेला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह इंडिया आघाडीतील विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात आयोजित या सभेत विरोधकांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित केला.

Advertisement

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात ईव्हीएम आणि मतदार याद्यांमध्ये कथित अनियमितता झाल्याचा आरोप केला. मतदार यादीतून अनेक तरुणांची नावे वगळण्यात आल्याचा दावा करत त्यांनी सुमारे 13 कोटी मतदारांची नावे हटवण्यात आल्याचे म्हटले. 2024 ची निवडणूक अवैध होती, असा आरोपही त्यांनी केला. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची भूमिका असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला.

ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका करताना राहुल गांधी यांनी त्यांना तुरुंगात जावे लागेल, असे विधान केले. निवडणूक प्रक्रियेत कथित गैरप्रकार झाल्याच्या आरोपांची कायदेशीर चौकशी व्हावी आणि जबाबदार व्यक्तींवर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

Advertisement

‘मोदींनाही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल’

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही राहुल गांधी यांनी भाषणातून निशाणा साधला. देशाची राज्यघटना सर्वोच्च असून कोणतीही व्यक्ती तिच्यापेक्षा मोठी नाही, असे ते म्हणाले. कथित गैरप्रकारांबाबत कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि संबंधितांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, अशी भूमिका त्यांनी मांडली.

शेतकरी, तरुण आणि कामगारांच्या हक्कांसाठी तसेच संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी विरोधक एकत्र आले असल्याचेही राहुल गांधी यांनी सांगितले. देश काही मोजक्या व्यक्तींच्या इच्छेनुसार चालू नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.

‘मोदींना हटवू, संविधानाचे रक्षण करू’; खरगे

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही सभेत केंद्र सरकारवर टीका केली. पंतप्रधान मोदी यांना सत्तेतून हटवून संविधान आणि लोकशाहीचे संरक्षण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईला विरोधक घाबरणार नसल्याचे सांगत त्यांनी सीबीआय आणि ईडीचा उल्लेख केला.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीही खरगे यांनी केली. त्यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन थांबणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततेच्या मुद्द्यावरून इंडिया आघाडीने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात आपली भूमिका अधिक आक्रमकपणे मांडली.

Advertisement
Tags :

.