Ichalkaranji: वस्त्रनगरीतील नशा बाजारावर अधिवेशनात चर्चा, Rahul Awade यांनी कोणती मागणी केली?
वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असून ते शैक्षणिक हब म्हणूनही ओळखले जाते
इचलकरंजी : वस्त्रनगरी इचलकरंजी आणि परिसरात अंमली पदार्थ खरेदी-विक्रीच्या प्रमाणात वाढ होत चालली असून युवापिढीबरोबर कामगार वर्गही त्याला बळी पडत आहे. नशेचा बाजार चालविणाऱ्या संबंधितांवर वेळीच कठोर कारवाई करण्याची गरज आहे. त्यामुळे राज्य शासनाने विशेष मोहिम राबवून ड्रग्ज तस्कर, विक्रेते यांच्या कारवाई करुन समुळ उच्चाटन करावे, अशी मागणी आमदार राहुल आवाडे यांनी पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्यावर बोलताना केली.
मागील काही महिन्यात शहर व परिसरासह कोल्हापूर जिल्ह्याला अंमली पदार्थाचा विळखा पडत आहे. पोलिसांनी विविध ठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज, नशिले पदार्थ व इंजेक्शनचा साठा जप्त केला आहे. परंतु अशा घटनांना वेळीच आळा बसण्यासाठी मुळावरच घाव घालण्याची गरज आहे.
हाच औचित्याचा मुद्दा बुधवारी आमदार आवाडे यांनी अधिवेशनात उपस्थित केला. ते म्हणाले, इचलकरंजी हे वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असून ते शैक्षणिक हब म्हणूनही ओळखले जाते. मागील काही महिन्यांत शहर आणि परिसरात अंमली पदार्थ विक्री, सेबन अशा अनेक घटना घडल्या आहेत.
वस्त्रोद्योगामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक कामगार तर शिक्षणाच्या निमिताने अनेक विद्यार्थी-विद्यार्थीनी इचलकरंजीत वास्तव्यास आहेत. त्यामुळे कामगारांसह बहुतांश प्रमाणात युवापिढी गांजा सेवनाच्या विळख्यात अडकत चालली आहे. त्याचाच फायदा घेत जंमली पदार्थाची विक्री जोरात सुरु आहे. हे प्रमाण वाढतच चालले असून ते रोखण्यासाठी मुख्य सूत्रधारांवर कारवाईची गरज आहे.
मागील महिन्यात गांजाची खरेदी-विक्री प्रकरणात इचलकरंजीसह सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील ८ जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखा पथकाने अटक केले होती. या कारवाईत तब्बल ४१ किलो गांजा, चारचाकी व दुचाकी वाहने, मोबाईल व रोकड असा सुमारे ३० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
सकाळी अटक केलेल्या सर्वच संशयितांची सायंकाळी सुटका झाली. यामागे केवळ पोलिस प्रशासनाचा अक्षम्य दुर्लक्षपणा कारणीभूत आहे. या प्रकरणासह सर्वच प्रकरणांची पारदर्शक चौकशी करुन अंमल पदार्थांची तस्करी, खरेदी-विक्री करणार्या टोळ्यांवर तसेच मुख्य सूत्रधारावर कठोर कारवाई करावी.
भविष्यात युवापिढी, विद्यार्थी अंमली पदार्थाच्या व्यसनात गुरफटू नयेत यासाठी राज्य शासनाने सक्षम व कठोर उपाययोजना करत विशेष मोहिम राबवून अशा गुन्हेगारांचे समूळ उच्चाटन करावे, अशी मागणी आमदार आवाडे यांनी केली आहे.
स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यातील अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासह या पदार्थांच्या विक्रीवरच प्रतिबंध आणण्यासंदर्भात आमदार राहुल आवाडे यांनी तारांकीत प्रश्न मांडला होता. त्यावर उत्तर देताना गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, अंमली पदार्थाच्या व्यापार व प्रसारास आळा घालण्यासाठी सर्वच पोलिस घटकांमध्ये स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन केल्याचे सांगत अंमली पदार्थ टास्क फोर्स महाराष्ट्र राज्य पुणे यांची राज्यासाठी नार्कोड सचिवालय म्हणून तर विशेष पोलिस महानिरिक्षक, अंमली पदार्थ बिरोधी टास्क फोर्स यांची राज्यस्तरीय नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केल्याचे सांगितले.