रहाणेच्या दीडशतकाने मुंबई सुस्थितीत
वृत्तसंस्था/ मुंबई
माजी कर्णधार अजिंक्य रहाणेच्या शानदार दीडशतकाच्या जोरावर रणजी क्रिकेट स्पर्धेतील इलाईट ड गटातील येथे सुरु असलेल्या सामन्यात रविवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी मुंबईने पहिल्या डावात 8 बाद 406 धावा जमविल्या. पावसाच्या अडथळ्यामुळे दुसऱ्या दिवशीचा बराच खेळ वाया गेला.
छत्तीसगडविरुद्ध सुरु असलेल्या या सामन्यात मुंबईने 5 बाद 251 या धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. पण वारंवार पावसाच्या सरी कोसळत असल्याने केवळ 46 षटकांचा खेळ झाला. या सामन्यात खेळाच्या पहिल्या दिवशी 118 धावांवर असताना स्नायू दुखापतीमुळे पायात गोळे आल्यामुळे रहाणेला मैदान सोडावे लागले होते. पण रविवारी तो पुन्हा मैदानात फलंदाजी करण्यासाठी आला. त्याने 303 चेंडूत 21 चौकारांसह 159 धावा झळकाविल्या. आदित्य सरवटेने त्याला झेलबाद केले. सरवटेने मुंबईच्या पहिल्या डावात 103 धावांत 4 गडी बाद केले आहेत. दिवसअखेर आकाश आनंद 5 चौकारांसह 60 तर तुषार देशपांडे 4 धावांवर खेळत आहे. छत्तीसगडच्या रवीकिरणने 53 धावांत 3 गडी बाद केले.
दिल्लीचा 430 धावांचा डोंगर
दिल्लीत सुरु असलेल्या रणजी स्पर्धेतील सामन्यात दिल्लीने पहिल्या डावात 430 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर दुसऱ्या दिवसाअखेर हिमाचल प्रदेशने पहिल्या डावात 3 बाद 165 धावा जमविल्या. दिल्लीच्या पहिल्या डावात अर्पित राणाने 64, सांगवान 79, यश धुलने 61, आयुष डोसेजाने 75, सुमित माथुरने 51, रावतने 57 धावा केल्या. हिमाचल प्रदेशतर्फे आरोरा आणि गुलेरिया यांनी प्रत्येकी 4 गडी बाद केले. हिमाचल प्रदेशच्या डावात सिद्धांत पुरोहितने 70 धावा जमविल्या. दिल्लीच्या नवदीप सैनीने 20 धावांत 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक - मुंबई प. डाव 8 बाद 406 (अजिंक्य रहाणे 159, सिद्धेश लाड 80, आकाश आनंद खेळत आहे 60, सरवटे 4-103, रवीकिरण 3-53).
दिल्ली प. डाव सर्वबाद 430 (अर्पित राणा 64, सांगवान 79, धुल 61, डोसेजा 75, माथूर 51, रावत 57, अरोरा व गुलेरिया प्रत्येकी 4 बळी), हिमाचल प्रदेश प. डाव 3 बाद 165 (सिद्धांत पुरोहित 70, नवदीप सैनी 2-20).