पतंग पकडण्यासाठी गेलेल्या मुलाचा इमारतीवरून पडून दुर्दैवी मृत्यू
वडगावातील घटनेने परिसरात हळहळ
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : पतंग पकडताना दुसऱ्या मजल्यावरून पडून एका शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मंगळवारी सायंकाळी धामणे रोड, वडगाव येथे ही घटना घडली असून शाळकरी मुलाच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
साद मंजूरअली टिनवाले (वय 9 वर्षे) असे त्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. निजामियानगर, धामणे रोड, वडगाव परिसरात त्याचे वास्तव्य होते. आपल्या घराशेजारील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर खेळताना वाऱ्यातून उडून आलेला पतंग पकडण्यासाठी साद पुढे सरसावला. फायबरच्या पत्र्यावर त्याने पाय ठेवला. उंचावरून पडून तो गंभीर जखमी झाला.
सादला कुटुंबीयांनी तातडीने खासगी इस्पितळात हलविले. उपचाराचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला. सादच्या पश्चात आई-वडील, भाऊ, आजी-आजोबा, काका-काकी असा परिवार आहे. तो तिसरीत शिकत होता. मंगळवार दि. 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
घटनेची माहिती समजताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सादच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. खेळता खेळता पतंग पकडण्याचा प्रकार जीवघेणा ठरला. असे प्रकार टाळण्यासाठी मुलांनी खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.