रघुवीर घाट अद्याप पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला नाहीच ! रस्ता दुरुस्तीसह संरक्षक भिंती उभारण्याचे काम युद्धपातळीवर
खेड: रत्नागिरी व सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटात ठिकठिकाणी कोसळलेल्या दरडींसह रस्त्याचा मोठा भाग खचल्याने मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सद्यस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या दुरुस्तीसह संरक्षक भिंती उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने अद्याप या घाटातील वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू केलेली नाही.
रघुवीर घाटातील रस्ता खचल्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने घाटातील पर्यटन व सर्वसामान्य खासगी वाहनांच्या वाहतुकीवर घातलेली बंदी अजूनही कायमच ठेवली आहे. केवळ स्थानिक ग्रामस्थांची सोय आणि अत्यावश्यक सेवा लक्षात घेत मर्यादित स्वरुपात एसटी बसेस व आपत्कालीन वाहनांनाच सुरक्षिततेचे नियम पाळून वाहतुकीस मुभा देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार घाटातील रस्त्याची डागडुजी आणि खचलेल्या भागाचे मजबुतीकरण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. रस्ता पूर्णपणे पूर्ववत व सुरक्षित होण्यासाठी आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे.