Kolhapur Crime | कोल्हापुरात लॉज ग्राहकांच्या पळवापळवीतून राडा; भरदुपारी तलवार नाचवून दहशत माजवण्याचा प्रयत्न
बिनखांबी गणेश मंदिर परिसरात दोन एजंटांमध्ये वाद
कोल्हापूर - कोल्हापूर लॉजसाठी ग्राहकांची पळवापळवी दोन करण्याच्या वादातून एजटांनी तलवार नाचवून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. रविवारी दि.२९ रोजी भरदुपारी बिनखांबी गणेश मंदिर परिसरात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले होते. रोहित सतीश गोसावी (वय २७, रा. राजघाट गल्ली, शिवाजी पेठ, कोल्हापूर) आणि अभिषेक सर्जेराव भोसले (२६, रा. सरनाईक वाडा, शिवाजी पेठ, कोल्हापूर) यांना ताब्यात घेतले. याबाबत अधिक माहिती अशी की, बिनखांबी गणेशमंदिर, महाद्वार रोड, ताराबाई रोड परिसरात लॉजसाठी ग्राहक मिळविण्याची स्पर्धा काही एजंटकडून सुरू असते. रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास ग्राहकांना माहिती देण्यावरून दोन लॉजच्या एजंटमध्ये वाद झाला.
त्यानंतर एक तरुण थेटतलवार घेऊन रस्त्यावर आला. तलवार नाचवत त्याने दुसऱ्या लॉजच्या एजंटना हुसकावण्याचा प्रयत्न केला.हा प्रकार पाहून काही नागरिकांनी ११२ या आपत्कालीन क्रमांकावरून पोलिसांना माहिती दिली. तातडीने पोहोचलेल्या जुना राजवाडा पोलिसांनी गोसावी आणि भोसले या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील तलवार जप्त केली. गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. भरदिवसा रस्त्यावर तलवार नाचवण्याचा प्रकार घडल्याने या परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.