शटडाउनमुळे रेडिओ फ्री एशियाचे संचालन बंद
अमेरिकेच्या प्रशासनाकडून निधी न मिळाल्याने घेण्यात आला निर्णय
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
वित्तीय अनिश्चिततेदरम्यान संपादकीय संचालनाला बंद करत असल्याचे रेडिओ फ्री एशियाने जाहीर केले आहे. अमेरिकेत संघीय प्रशासनाच्या शटडाउनला एक महिन्याचा कालावधी झाल्याने ही स्थिती ओढवली असल्याचे रेडिओ फ्री एशियाचे सांगणे आहे. अमेरिकेच्या प्रशासनाच्या निधीद्वारे संचालित होणाऱ्या रेडिओ फ्री एशियाला नव्या आर्थिक वर्षासाठी अद्याप निधी मिळालेला नाही. यामुळे रेडिओ फ्री एशिया शुक्रवारपासून न्यूज कंटेटचे प्रॉडक्शन बंद करणार आहे. स्वत:च्या मर्यादित साधनसामग्रीला संरक्षित करणे आणि सातत्याने निधी उपलब्ध झाल्यास संचालन पुन्हा सुरू करण्याची शक्यता कायम ठेवण्याच्या प्रयत्नात आरएफए स्वत:ची कार्यकक्षा कमी करण्यासाठी काही नवे पावले उचलत असल्याचे आरएफएचे सीईओ बे फँग यांनी सांगितले.
जवळपास 30 वर्षांमध्ये पहिल्यांदाच रेडिओ फ्री एशिया अशाप्रकारचे पाऊल उचलत आहे. रेडिओ फ्री एशिया स्वत:च्या विदेशी विभागालाही बंद करणार आहे. तसेच औपचारिक स्वरुपात रजेवर गेलेल्या कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याचे फँग यांनी सांगितले आहे. चालू वर्षाच्या प्रारंभी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून रेडिओ फ्री एशिया आणि त्याचे सहकारी प्रसारक व्हॉइस ऑफ अमेरिका आणि रेडिओ फ्री युरोपसाठी निधी बंद करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर शेकडो आरएफए कर्मचाऱ्यांना बिनपगारी सुटीवर पाठविण्यात आले होते. रेडिओ फ्री एशिया 1996 पासून पूर्ण आशियात प्रसारण करत आहे. याचे बहुभाषिक पत्रकार अनेक देशांमध्ये विश्वसनीय बातम्या प्रसारित करत असतात.