धरण उशाला...तहान घशाला ! राधानगरी अभयारण्य क्षेत्रातील ओलवण ग्रामस्थांची अवस्था
राधानगरी / प्रतिनिधी
राधानगरी तालुक्याच्या पश्चिम टोकाला, धरणाच्या शेवटच्या टप्प्यात असणारे निसर्ग संपन्न डोंगरातील गाव म्हणजे ओलवण होय. ज्या धरणांमधून मिळणाऱ्या पाण्यावर संपूर्ण जिल्हा आपली तहान भागवतो. त्याला लागूनच असणाऱ्या ओलवण गावात मात्र धरण उशाशी, तहान घशाशी अशी अवस्था पिण्याच्या पाण्यावाचून झालेली आहे.
ओलवण गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहिरीमध्ये मेलेल्या माशांचा खच व एक प्रकारचा तेलकट तवंग गेल्या तीन ते चार दिवसापासून निर्माण झालेला आहे. सुमारे ७०० ते ८०० लोक या सार्वजनिक विहिरीवर आपली पाण्याची दैनंदिन गरज भागवित असतात. परंतु पाण्याच्या या अवस्थेमुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न तर निर्माण झालेला आहेच शिवाय आता पाणीपुरवठाही बंद असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची देखील गैरसोय झालेली आहे. जिल्ह्याची तहान भागवण्यासाठी धरणासाठी ज्या लोकांनी योगदान दिले त्याच लोकांच्या नशिबी केवळ ग्रामपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आलेली आहे अशी चर्चा परिसरातील ग्रामस्थांमध्ये चालू आहे. सार्वजनिक विहिरीची ही अवस्था पहिल्यांदाच झालेली असून ग्रामपंचायतीने व संबंधित प्रशासन विभागाने यावर त्वरित उपाययोजना करावी तसेच स्वच्छ व सुरळीत पाण्याचा पुरवठा लवकरात लवकर चालू करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.