Radhanagari Tourism: राधानगरीतील पर्यटनस्थळांचा विकास होणे का आवश्यक आहे?
धबधबे व निसर्गस्थळे योग्य त्या सुविधा नसल्यामुळे पर्यटकांपासून दूर राहत आहेत
By : महेश तिरवडे
राधानगरी : राधानगरी तालुका सध्या पावसाळी पर्यटनासाठी विशेष ओळख निर्माण करू लागला असला, तरी येथील अनेक नैसर्गिक स्थळे अद्यापही विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यात चार मोठी धरणे राधानगरी, काळमावाडी, तुळशी व नव्याने झालेलं धामणी धरण या तालुक्याला पाणी व निसर्गाची संपत्ती प्रदान करत आहेत. मात्र, अनेक धबधबे व निसर्गस्थळे योग्य त्या सुविधा नसल्यामुळे पर्यटकांपासून दूर राहत आहेत.
राऊतवाडी धबधबा हा पर्यटकांच्या सोईचा सोडल्यास रामणवाडी येथील गायकडा, कासारवाडी, पडसाळी येथील
सोनकडा, खिंडी व्हरवडे येथील म्हसोबा धबधबा, बनाचीवाडीचा 'हिडन कापा' धबधबा, हसणे येथील लघुप्रकल्प धबधबा, काळमावाडी धबधबा, माजगाव व चक्रेश्वरवाडीतील धबधबा, शेळप बांबर पठाणपूल धबधबा, अभ्यारण्यातील हत्तीकडा अशा अनेक ठिकाणी नैसर्गिक सौंदर्य असूनही पायाभूत सुविधा नाहीत.
याठिकाणी जाण्यासाठी रस्त्यांची वानवा आहे, तसेच सुरक्षितता, स्वच्छतागृहे, वाहनतळ, विश्रांतीगृह, माहिती फलक अशा मूलभूत सुविधा पुरवल्या गेलेल्या नाहीत. राधानगरी तालुका हा पर्यटन तालुका घोषित झाल्यापासून तालुक्यातील अनेक पर्यटनस्थळे विकसित झाली नाहीत.
पर्यटन विकासाच्या माध्यमातून अनेक स्थळे विकसित होणे अपेक्षित आहे, जेणेकरून स्थानिक नागरिकांना याचा लाभहोऊन रोजगार निर्मिती वाढेल. सुहास निंबाळकर, अध्यक्ष, राधानगरी तालुका मराठा महासंघ परिणामी, अनेक पर्यटकांची पावले या ठिकाणांकडे वळत नाहीत.
हत्तीमहाल येथील शाहूकालीन साठमारी, काळमावाडी येथील वृंदावन गार्डन व राधानगरी धरण परिसराचा सुशोभीकरण आदी विकासकामे प्रलंबित आहेत. तालुक्याचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास होण्यासाठी व गुंतवणूकदारांची पावले याकडे वळवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, अशी स्थानिकांकडून जोरदार मागणी केली जात आहे
पर्यटनवाढीसोबत स्थानिक युवकांना रोजगार, महिला बचत गटांना विक्री संधी आणि तालुक्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. शासनाने या मागण्यांकडे लक्ष देऊन त्वरित निधी व योजनांची अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.