For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

राधानगरी जलाशयाच्या बॅकवॉटरची पर्यटकांना भुरळ! हसणे ते दाजीपूर दरम्यान प्रतिसमुद्र

01:19 PM Nov 29, 2023 IST | Abhijeet Khandekar
राधानगरी जलाशयाच्या बॅकवॉटरची पर्यटकांना भुरळ  हसणे ते दाजीपूर दरम्यान प्रतिसमुद्र

युवराज भित्तम / म्हासुर्ली

नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेला राधानगरी तालुक्यातील अनेक पर्यटस्थळे पर्यटकांना भुरळ घालत आहेत.अशाच प्रकारे ऐन पर्यटन हंगामात सध्या निपाणी - राधानगरी - फोंडा - देवगड राज्यमार्गावरून कोकण - गोव्याकडे प्रवास करणाऱ्या पर्यटकांना राधानगरी जलाशयाच्या बॅकवॉटरचा हसणे ते दाजीपूर दरम्यानचा किनारा भुरळ घालत असून पर्यटकांची पावले आपोआप इकडे वळत आहेत.नव्याने तयार झालेल्या या पर्यटन ठिकाणी दररोज शेकडो पर्यटक थांबत असून निळ्याशार किनाऱ्यावरील लाटा झेलत जलाशयात मनसोक्त डुबण्याबरोबरच मोबाईल मध्ये सेल्फी घेण्याचा आनंद घेत आहेत.

Advertisement

दसरा- दिवाळी पासून राधानगरी तालुक्यात पर्यटन हंगाम जोरात सुरु झाला आहे. निपाणी - देवगड राज्य मार्गावरुन राधानगरी ते दाजीपूर दरम्यानच्या जंगलातून वेड्या वाकड्या वळणाच्या रस्त्यावरुन प्रवास करताना पर्यटकांना आल्हादायक वातावरणाची अनुभूती मिळते. आणि सध्याच्या दैनदिन व्यापातून थकलेल्या मनाला नवचैतन्य प्राप्त होते.

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी राधानगरी धरणाची निर्मिती केली असून पर्यटकांना या ऐतिहासिक धरणासह, धरणाच्या बँक वॉटर परिसरातील निळाशिर किनारा आणि लाटा व दुर्मिळ अशा पर्यटन स्थळांबरोबरच ग्रामीण जीवन शैलीचे दर्शन खुणावते.

Advertisement

राधानगरी शहरा पासून ३२ किलोमीटर अंतरावर असलेल्या हसणे - दाजीपूर गावांच्या हद्दीपर्यंत राधानगरी जलाशयाचे बॅक वॉटर पसरले आहे.तर हसणे ते दाजीपूर या पाच कि.मी. मार्गावर रस्त्याच्या उजव्या बाजूला जलाशयाचा विस्तीर्ण असा निळा किनारा पसरला आहे.
राधानगरी धरण पाण्याने तुडुंब भरल्याने बॅक वॉटर परिसरातील पाणी स्वच्छ निळेशार दिसत असून वाऱ्याच्या झोतावर लहान मोठ्या लाटांची निर्मिती होत असल्याने येथे प्रति समुद्रच भासतो.समुद्राप्रमाणे किनाऱ्यावर येणाऱ्या पाण्याच्या लाटा पाहून या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या पर्यटकांना किनारी थांबण्याचा मोह होत आहे.

Advertisement

बॅक वॉटरच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटक थांबत असल्याने असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी ही येथे खाद्य पदार्थाचे स्टॉल मांडलेले आहेत. तर हसणे पुलाच्या पलिकडे ग्रामपंचायतीने बॅक वॉटरच्या काठावर छानसा दगडी घाट बांधला असल्याने पिकनिक पॉईंट तयार झाला आहे. पर्यटक ही सदर घाटावर विसावा घेत असून सोबत आणलेल्या खाद्यपदार्थाचा आस्वाद घेताना दिसत आहेत.

सध्या कोकण व गोव्यातील पर्यटन हंगाम सुरु असून राधानगरी - फोंडा - विजयदुर्ग ते गोवा राज्य मार्गावर पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरू आहे.त्यातच पर्यटकांना प्रवासा दरम्यान विरंगुळ्यासह विश्रांतीसाठी राधानगरी जलाशयातील बॅक वॉटरचा किनारा खुणावत आहे.जलाशयातील बॅक वॉटरचे पाणी जानेवारी अखेर पर्यत किनाऱ्यावर राहत असल्याने पर्यटकांना याची मज्जा घेता येणार आहे.

Advertisement
Tags :
×

.