For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Rautwadi Waterfall; राऊतवाडी धबधबा फुलला, पर्यटकांची रेलचेल; सुरक्षिततेसाठी पोलिसांचा विशेष बंदोबस्त

04:42 PM Jul 04, 2026 IST | NEETA POTDAR
rautwadi waterfall  राऊतवाडी धबधबा फुलला  पर्यटकांची रेलचेल  सुरक्षिततेसाठी पोलिसांचा विशेष बंदोबस्त
Advertisement

                                       नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

Advertisement

राधानगरी:  जिल्यातील व राधानगरी तालुक्यातील प्रसिद्ध राऊतवाडी धबधबा पावसामुळे प्रवाहित झाल्यानंतर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी राधानगरी पोलीस ठाण्याकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला असून, धोकादायक कृत्ये करणाऱ्या तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस निरीक्षक अजित सिद यांनी दिला आहे.

धबधब्याच्या कड्यावर चढणे, धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी काढणे, प्रचंड पाणीप्रवाहात उतरून जीव धोक्यात घालणे, मद्यप्राशन करून हुल्लडबाजी करणे, महिला व इतर पर्यटकांना त्रास होईल असे वर्तन करणे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे असे प्रकार काही पर्यटकांकडून होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकारांमुळे गंभीर अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement

पर्यटकांनी पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, वाहने शिस्तबद्ध पद्धतीने पार्क करावीत आणि वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

राऊतवाडी धबधबा, राधानगरी धरण व परिसरात मद्यप्राशन करून अथवा कोणत्याही नशेच्या पदार्थाचे सेवन करून प्रवेश करणाऱ्यांवर तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. परिसरात वाहनांची तपासणीही करण्यात येणार असून, वाहनात मद्य किंवा अन्य नशेचे पदार्थ आढळल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल, असेही पोलिसांनी सांगितले आहे.

पर्यटकांनी स्वतःची, आपल्या कुटुंबीयांची व सहकाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन जबाबदारीने पर्यटनाचा आनंद घ्यावा आणि सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक अजित सिद यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.