राधानगरीत डान्सग्रुप व लेसरला फाटा देत पारंपरिक वाद्याच्या गजरात विसर्जन
मोठ्या उत्साहात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गणपतीचे विसर्जन, सो, शिरोली व पनोरी येथे पारंपरिक वाद्याच्या गजरात विसर्जन
राधानगरी / महेश तिरवडे
येथील 13 सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेश मुर्तींचे विसर्जन पोलिस प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत पारंपरिक वाद्यांच्या गजरात, विद्युत रोषणाईत, ध्वनीफितीवरील गाण्याच्या तालावर तरुणाईने धरलेला ठेका अशा भक्तीमय वातावरणात करण्यात आले. लेसर लाईट व ग्रुप डान्स यांना फाटा देत हि मिरवणूक काढून आदर्श घालून दिला आहे.
दरवर्षी राधानगरी येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेश मुर्तींचे विसर्जन अनंतचतुर्थीच्या दिवशी करण्यात येते, दुपारी तीनच्या सुमारास शिवाजी तरुण मंडळ, साई चौक, जुनीपेठे अंबाबाई, गुडलक आदी मंडळांनी गणपतीचे विसर्जन केले तर सायंकाळी सहा नंतर शाहू तरुण मंडळ, शिवशक्ती लंकानी कट्टा मित्र मंडळ, सिद्धिविनायक, सह्याद्री व गणेश तरुण मंडळांनी सार्वजनिक गणेश मुर्ती चे विसर्जन मोठ्या भक्तीमय वातावरणात ओढ्यावर विसर्जन करण्यात आले.
राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली येथील शिवशक्ती कला, क्रीडा, सांस्कृतिक तरुण मंडळ गेली एकतीस वर्षे गणेशोत्सव साजरा करण्यात येतो या मंडळानं अनावश्यक रूढींना फाटा देत १२० टाळकरी माळकऱ्यांना एकत्रित करत आणि टाळ - मृदंगाचा गजर करत,लेझीम ढोल ताशांचा तालावर गणरायाला निरोप दिला.
यावेळी आळंदी येथील शंभराहुन अधिक बालवारकऱ्यांनी भक्ती गीतं ,अभंग,टाळ मृदंग आणि लोकवाद्यांच्या गजरात मिरवणूक काढली.तर ग्रामीण युवाशक्ती संघटना पनोरी मंडळाच्या वतीने डॉल्बी चे दुष्परिणाम लक्षात घेऊन डॉल्बीमुक्त गणेश विसर्जन मिरवणूक काढून पारंपारिक वाद्य ढोल, ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यास प्राधान्य दिले यावेळी गावातील सर्व तरुण/ ज्येष्ठ नागरिक /महिलांनी अबाल वृद्धांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता महिलांनी यावेळी पारंपारिक गौरी गीते सादर केली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष ,सचिव, सर्व सदस्य, ग्रामस्थ, तसेच बिद्रीचे माजी संचालक,नंदकिशोर सूर्यवंशी, उपस्थित होते, राधानगरी येथील व्यापारी संघटना व खंडोबा तालीम यांच्या वतीने गणेशोत्सव मंडळांना नारळ व पानाचा विडा देऊन गणपतीना पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले
या विसर्जन मिरवणूकीत ग्रुप डान्स व लेसर लाईट चा वापर करु नये असे आवाहन राधानगरी पोलिस प्रशासन केले होते. त्यास राधानगरी गावातील सर्वच सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी प्रतिसाद देत. नियमांचे उल्लंघन न करता पारंपरिक वाद्यांच्या गजरात, लाईटच्या प्रकाशझोतात,गाण्याच्या तालावर तरुणाईने जल्लोष साजरा केला. राधानगरी येथे बऱ्याच वर्षांनी डान्सग्रुपला बंदी घालण्यात आल्याने पोलिस निरीक्षक संतोष गोरे व पोलिस प्रशासनाचे स्थानिक नागरिकांकडून कौतुक होत आहे